राज्यातील व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या ७५ टक्के विद्यार्थ्यांना या परीक्षेत निम्म्यापेक्षाही म्हणजे १०० पेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे महाविद्यालये भरण्यासाठी गुणवत्तेशी तडजोड करावी लागण्याचीच शक्यता आहे. या परीक्षेत ५ विद्यार्थी १७० गुण मिळवून अव्वल ठरले आहेत.
काही वर्षांपासून व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्थांना विद्यार्थी शोधण्याची वेळ आली होती. मात्र, त्यानंतर संस्थांनी अभ्यासक्रम बंद करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमताही घटली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरील जीमॅटसारख्या प्रवेश परीक्षेऐवजी गेल्या वर्षीपासून राज्याची स्वत:ची प्रवेश परीक्षा सुरू झाली. पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी  ४५ हजार जागांसाठी ५७ हजार २२४ विद्यार्थी पात्र ठरले.
पेपरफुटीप्रकरणी प्राचार्य अटकेत
मुंबई: बारावीच्या वाणिज्य शाखेच्या ‘बुक किपिंग अ‍ॅण्ड अकाऊंटन्सी’ या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून झालेल्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे सापडले असून नवी मुंबई पोलिसांनी मालाडमधील अलिया सरवार शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य आणि संस्थाचालकाला अटक केली आहे. या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून फिरत असल्याचे निष्पन्न झाले होते.
मुंबई राज्य शिक्षण मंडळाने या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने या प्रकरणी तपासाला सुरुवात केली. या पेपरफुटीचे धागेदोरे मालाडमधील कनिष्ठ महाविद्यालयात आढळून आले आहेत. पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनच या प्रकरणाचा छडा लावला. मालाडमधील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक असगर अली सरपर आणि विश्वस्त फारूख रिझवी यांनी ही प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून बाहेर पाठविली होती. हे दोघे मालाडमधील दिंडोशी येथील रहिवासी आहेत.