ख्यातनाम गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे १७ आणि १८ जानेवारी रोजी राज्यस्तरीय गणित अध्यापकांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.  कल्याणमधील आचार्य अत्रे नाटय़गृहात हे अधिवेशन होईल. रामानुजन् यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित वर्ष साजरे करण्याचे आवाहन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले होते. त्या आवाहनाला अनुसरून हे अधिवेशन भरविले जात आहे. राज्यभरातून दोन हजार गणित अध्यापक या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.गणिताच्या अभ्यासाला चालना देणे, गणिताविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणे या उद्देशाने राज्यातील गणित विषयातील तज्ज्ञांची व्याख्याने, परिसंवाद यांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अनिल बोरनारे यांनी दिली.
 गणित अध्यापन-अध्ययन व अभ्यासक्रमातील आमूलाग्र बदल, अडीअडचणी वा समस्या सोडविण्यासाठी हे अधिवेशन शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना लाभदायी ठरणार आहे. खगोलशास्त्राचे अभ्यासक दा. कृ. सोमण हे वैदिक गणित, मराठी विज्ञान परिषदेचे अभय यावलकर हे उपक्रमशील गणित, भा. स. भामरे हे शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षा, व्ही. पी. पाटील हॉट्सवर मार्गदर्शन करतील.विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, पालक मंत्री गणेश नाईक, शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, राज्यमंत्री फौजिया खान आदी मान्यवर उपस्थित राहतील.
या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते असतील. तर विशेष पाहुणे म्हणून कोकण पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे उपस्थित राहतील.
नांवनोंदणीसाठी संपर्क
बी.एन.पाटील – ९८७०२७६०६०
एन.एम.भामरे – ९०२९२६७२५५
पी.के. बोडे  – ९२७२७०४६७८