व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता नुकत्याच पार पडलेल्या ‘एमबीए-सीईटी’तील चुका आणि तांत्रिक दोषांमुळे ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी तंत्रशिक्षण संचालनालयाने फेटाळून लावल्याने विद्यार्थ्यांना याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
या प्रवेशपरीक्षेतील प्रश्नांमध्ये चुका आढळून आल्याने तब्बल ५८ प्रश्न वगळण्याची नामुष्की संचालनालयावर आली होती. परंतु, केवळ प्रश्न रद्द करून हा प्रश्न सुटणार नसून परीक्षेत इतरही तांत्रिक दोष होते. त्यामुळे ही फेरपरीक्षा घेऊनच हा प्रश्न सुटेल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात विद्यार्थ्यांनी सोमवारी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्याची भेटही घेतली. मात्र यात काहीच तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांनी आता याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले आहे.
व्यवस्थापनाच्या विविध अभ्यासक्रमांच्या २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांच्या प्रवेशांकरिता १४ आणि १५ मार्च रोजी चार वेगवेगळ्या सत्रांमध्ये ऑनलाइन पद्धतीने सीईटी घेण्यात आली होती. प्रत्येक सत्राची प्रश्नपत्रिका वेगवेगळी होती. या परीक्षेबाबत उमेदवारांकडून तांत्रिक व प्रश्नांच्या बाबतीत तक्रारी आल्या होत्या. ही परीक्षा देणाऱ्या सत्र एकमधील विद्यार्थ्यांचे प्रामुख्याने समानीकरण करताना नुकसान झाले होते. परंतु, या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर संचालनालयाकडे उत्तर नसल्याने विद्यार्थ्यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.