मुंबई विद्यापीठाच्या एमकॉम आणि सीए या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षा दोन दिवस एकाच वेळी होणार असल्याने या दोन्ही परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नाईलाजाने यापैकी एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे.
देशभरात हजारो विद्यार्थी एकाच वेळेस या दोन्ही परीक्षा देत असतात. सीएची परीक्षा देशभरात एकाच वेळी होते. त्यामुळे विद्यापीठांना आपल्या एमकॉमच्या परीक्षांचे वेळापत्रक ठरविताना या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागते. पण, मुंबई विद्यापीठाने गेल्या सलग तीन परीक्षांत या प्रकारचा घोळ घातला आहे. मे, २०१३मध्येही या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्या होत्या. त्यानंतर हा घोळ नोव्हेंबर, २०१३ मध्येही घालण्यात आला. विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यानंतर विद्यापीठाने आयत्यावेळी आपल्या परीक्षांच्या तारखा बदलल्या.
आता मुंबई विद्यापीठाची एमकॉमची चौथ्या सत्राची श्रेयांक-श्रेणीनुसार होणारी परीक्षा २१ मे पासून सुरू होत आहे. चौथ्या सत्राची परीक्षा ही पदव्युत्तर पदवी मिळवून देणारी अंतिम परीक्षा असते. तर सीएची अंतिम परीक्षा २६ मेपासून सुरू होत आहे तर इंटरमिजीएटची २७ मे पासून. एमकॉमची परीक्षा सीएच्या परीक्षांशी २७ आणि २९ मे रोजी ‘क्लॅश’ होते आहे. विद्यापीठाने एमकॉम परीक्षेची तारीख एक दिवस जरी अलिकडे आणल्या तर त्या अंतिम परीक्षेशी क्लॅश होतील. त्यामुळे, ‘सीएच्या परीक्षेशी तडजोड करता येणे शक्य नसल्याने आम्हाला एमकॉमच्या परीक्षेवर पाणी सोडावे लागेल. अशा परिस्थितीत आम्हाला कोणतीही चूक नसताना एमकॉमची केटीची परीक्षा द्यावी लागेल,’ अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्यांने व्यक्त केली.
एमकॉमची परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. तर सीएची दुपारी २ ते सायंकाळी ५. मात्र, दोन्ही परीक्षांची केंद्रे वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने एक परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तातडीने दुसरे परीक्षा केंद्र गाठणे शक्य नाही. त्यामुळे, आमची एक परीक्षा आम्हाला बुडवावी लागेल़
एक विद्यार्थी