कोणतेही शास्त्र हे समाजाच्या हितासाठी असते. त्यातही वैद्यकशास्त्र हे समाजाच्या रोजच्या गरजेचे शास्त्र आहे. कोणत्या रोगासाठी कोणत्या पॅथीचे औषधोपचार करावेत, याचा निर्णय रुग्णाला घेता येत नसतो आणि म्हणूनच त्याला कोणत्या पॅथीच्या उपचारांची गरज आहे, याचा निर्णय त्याच्या चिकित्सकाला घेता आला पाहिजे व त्याला तसे उपचार करता येण्यासाठी आवश्यक बाबी त्याच्या अभ्यासक्रमात असल्याच पाहिजेत. त्या शिकवू नका असे म्हणणे, कोणत्याही कारणासाठी असे म्हणणे हा असंमजसपणा होय. ५००० वर्षांपूर्वी ‘चरक’ या आयुर्वेद संहिताकाराने जगातल्या सर्व चिकित्सकांसाठी ‘विविधाणि शास्त्राणि प्रचरन्ती लोके’ असे म्हणून सर्वच शास्त्रांचा उद्देश लोकांच्या सुखासाठी असतो. रोगारोगांच्या वैशिष्टय़ांनुसार विविध औषधोपचार असतात, म्हणूनच चांगल्या चिकित्सकाने ही शास्त्रे शिकायला हवीत, असा उपदेश केला आहे. हा उपदेश विसरून जो मनुष्य शास्त्राचा विचार करतो, तो शास्त्राचे नुकसान तर करतोच, पण त्याचबरोबर समाजाचेही नुकसान करत असतो.
होमिओपॅथीच्या डॉक्टरांना फार्माकॉलॉजी शिकविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत वरील भूमिकेतून केले आहे आणि त्याला ‘आयएमए’ विरोध करत असल्याने ‘अ‍ॅलोपॅथी आयएमएची मक्तेदारी नाही’ (‘लोकसत्ता’, २७ ऑगस्ट २०१२) हा लेख लिहिला. लेखाचा मूळ उद्देश व आशय लक्षात न घेता दि. २९ ऑक्टोबरच्या ‘आयुर्वेद होमिओपॅथी व युनानी डॉक्टरांचे भवितव्य काय’ या लेखात डॉ. सुरेश कुमार यांनी काही आक्षेप घेतले आहेत.
जबाबदार वर्तमानपत्रातून लेख लिहिताना अचूक आणि संपूर्ण माहिती देणे, ही जबाबदारी लेखकाने पाळलीच पाहिजे. ‘‘सर्वोच्च न्यायालयाने आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथिक औषधे वापरण्यावर बंदी केल्याने हे डॉक्टर संपावर जाणार असल्याचे वृत्त आहे.’’ हे लेखातील पहिलेच वाक्य चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘क्रॉस प्रॅक्टिस’ करण्यास म्हणजे न शिकलेल्या पॅथीची औषधे वापरण्यास प्रतिबंध केला आहे. आयुर्वेद आणि युनानी या चिकित्सापद्धतींच्या कौन्सिलने प्रथमपासून वेगळी भूमिका घेतली असल्याने आणि या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना आवश्यक तितके आधुनिक औषधशास्त्राचे ज्ञान दिले गेले असल्याने हे पदवीधर राज्य शासनाच्या आदेशाने कायदेशीरपणे अ‍ॅलोपॅथिक औषधे वापरू शकतात, ही बाब डॉ. सुरेश कुमार सांगत नाहीत. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा २० वर्षांपूर्वीचा असताना जणू तो नुकताच लागलाय असे भासवून होमिओपॅथी, आयुर्वेद आणि युनानी डॉक्टर संपावर जाणार असल्याचे वृत्त आहे, असे तरी काही नसताना म्हणणे ही गोष्टही योग्य नाही.
तसेच ‘१९७१ च्या आसपास मिश्र अभ्यासक्रम बंद केले’ हे सांगताना १९७५ च्या आसपास रिव्हाइज्ड बी.ए.एम.एस. हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला, हे सांगायचेही डॉ. सुरेश कुमार टाळतात. या गोष्टी त्यांना टाळता आल्या असत्या.
डॉ. सुरेश कुमारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनीच दिली आहेत; परंतु त्यांनी माझ्या मुद्दय़ांवर घेतलेल्या आक्षेपांना उत्तर देण्यापुरता या लेखाचे स्वरूप मी मर्यादित ठेवतो. डॉ. सुरेश कुमार लिहितात, ‘‘डॉ. विवेक कोरडे यांनी ‘अ‍ॅलोपॅथी आयएमएची मक्तेदारी नाही’ या लेखात होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथिक प्रॅक्टिस करणे कसे योग्य आहे, याचे जोरदार समर्थन केले आहे; परंतु होमिओपॅथिक डॉक्टरांनी होमिओपॅथीचीच प्रॅक्टिस का करू नये, याविषयी ते चकार शब्द बोलत नाहीत.’’ माझ्या संपूर्ण लेखात मी होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याचे समर्थन केलेले नाही. शासनाने त्यांना फार्माकॉलॉजी शिकविण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे, कारण या प्रश्नाकडे मी एका पॅथीच्या वा एका संघटनेचा वा एका व्यवसायाचा प्रश्न म्हणून उथळपणे न पाहता देशाच्या आरोग्यव्यवस्थेशी निगडित असलेला महत्त्वाचा प्रश्न या व्यापक अर्थाने पाहतो आणि म्हणूनच डॉ. सुरेश कुमार म्हणतात, त्याप्रमाणे जर या डॉक्टरांना केवळ फार्माकॉलॉजी शिकवून भागणार नाही, संपूर्ण जनरल मेडिसिन शिकवावे लागेल, या मताशी तसे होणे आवश्यक असल्यास मी संपूर्ण सहमत आहे; परंतु त्यांच्या ‘‘आता यापुढे तयार होणाऱ्या डॉक्टरांसाठी भविष्यात असे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून प्रवेश देतानाच हमीपत्र लिहून घ्यायला हवे.’’ या मताशी ते मत केवळ शास्त्राच्याच नव्हे तर लोकांच्याही हिताच्या विरुद्ध असल्याने, त्या संकुचित मताशी मी सहमत होऊ शकत नाही. डॉ. सुरेश कुमारांना दोन-चार वर्षांचा अ‍ॅलोपॅथीचा अभ्यासक्रम काढणे मान्य आहे; परंतु त्याच अभ्यासक्रमाचा समावेश अन्य पॅथींच्या अभ्यासक्रमातच करणे मान्य नाही, ही गोष्टच अनाकलनीय आहे.
‘‘विनाअ‍ॅलोपॅथिक डॉक्टर अ‍ॅलॉपॅथीची प्रॅक्टिस करणार कसे? त्याला कायद्याचा आधार नाही’’ असे विधान डॉ. सुरेश कुमार करतात. विनाअ‍ॅलोपॅथीचे नव्हे तर अ‍ॅलोपॅथीचे आवश्यक ज्ञान घेऊन अन्य पॅथीचे डॉक्टर्स प्रॅक्टिस करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय न शिकलेल्या पॅथीची प्रॅक्टिस करू नका असा आहे. एखादी पॅथी दुसऱ्या पॅथीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यास सर्वोच्च न्यायालयाने अद्याप तरी बंदी घातलेली नाही, ही गोष्ट डॉ. सुरेश कुमारांनी लक्षात ठेवायला हवी.
डॉ. सुरेश कुमार म्हणतात त्याप्रमाणे मी भारतीय व पाश्चात्त्य चिकित्सापद्धतींना एकत्र आणण्याचा हिरिरीने पुरस्कार केला आहे; परंतु हा पुरस्कार करण्यात मला शास्त्राचा विकास ही एकच गोष्ट अभिप्रेत नाही. हा पुरस्कार करताना या देशातली आरोग्यव्यवस्था ही सर्वसामान्यांना उपलब्ध, सुगम्य आणि परवडणारी असली पाहिजे, ही गोष्ट अभिप्रेत आहे आणि ही गोष्ट आजवरच्या मिश्रवैद्यकाने मोठय़ा प्रमाणावर साध्य केली आहे. ‘‘अ‍ॅलोपॅथिक डॉक्टर्स ग्रामीण भागात जात नाहीत व ग्रामीण आरोग्यव्यवस्था प्रामुख्याने होमिओपॅथिक व आयुर्वेदिक डॉक्टरांकडून सांभाळली जाते, हे बहुतांशी सत्य आहे,’’ असे डॉक्टर सुरेश कुमारच लिहितात. त्यामुळे याविषयी आणखी काही लिहायची गरज नाही. शासकीय सेवेतही आयुर्वेदिक डॉक्टर्स ही जबाबदारी गेली अनेक वर्षे पार पाडत आहेत, इतकेच येथे नमूद करतो.
आयुर्वेदात संशोधन झाले नाही, आयुर्वेदाचा विकास झाला नाही, ९५ टक्क्य़ांपेक्षा जास्त डॉक्टर्स अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करतात, मिश्र चिकित्सा पद्धतीचा प्रयोग फसला म्हणून मिश्र अभ्यासक्रम बंद केले, ही डॉक्टरसाहेबांची विधाने वस्तुस्थितीवर आधारलेली नाहीत. ‘‘सरकारही आयुर्वेदाला सापत्नभावाची वागणूक देते. पुरेसा पैसा किंवा सुविधा देत नाही,’’ असे जे डॉ. सुरेंद्र कुमार लिहितात, तेच त्याचे उत्तर आहे. आणि याहून महत्त्वाचे कारण आयुर्वेद पुरस्कर्त्यांचा दुराभिमान आणि कुपमंडूक वृत्ती हे आहे. याच वृत्तीतून मिश्र वैद्यकाच्या अभ्यासक्रमाला स्वत:ला आयुर्वेद हितचिंतक म्हणवून घेणाऱ्या आणि आयुर्वेदाच्या बंदिस्तपणातच ज्यांचे हितसंबंध गुंतले होते, अशा आयुर्वेदाच्या स्वयंघोषित रक्षणकर्त्यांनी प्रारंभापासून विरोध केला. मिश्र वैद्यकाने शास्त्राचा विकास रोखलेला नाही.
कदाचित याच वृत्तीतून अ‍ॅलोपॅथिक पद्धतीने रोगाचे निदान करायला डॉ. सुरेश कुमारांचा विरोध असावा. अ‍ॅलोपॅथीच्या रोगनिदानाच्या पद्धती वा साधने म्हणजे अ‍ॅलोपॅथी नव्हे, ही गोष्ट डॉ. सुरेश कुमारांनी समजून घ्यायला हवी. ही साधने अ‍ॅलोपॅथी नसून आधुनिक फिजिक्स, आधुनिक केमिस्ट्री आणि आधुनिक बायोकेमिस्ट्री आहे. म्हणजे विज्ञानाच्या एका शाखेने दुसऱ्या शाखेला दिलेली देणगी आहे. अ‍ॅलोपॅथीने या देणग्यांचा स्वीकार करत नवीन निदान पद्धती आणि औषधे विकसित करत अ‍ॅलोपॅथीचा विकास केला. आपल्यात काही कमी आहे, हे समजून घेऊन मान्य करणाऱ्यांचा विकास होतो. आयुर्वेदात संशोधन व्हावे, आयुर्वेदाचा विकास व्हावा, असे खरोखरच वाटत असेल तर सर्वप्रथम आयुर्वेदात काही तरी कमी आहे, ही गोष्ट मान्य करावी लागेल आणि आयुर्वेदातील संशोधन आधुनिक साधनांद्वारे आधुनिक निकषांवर करावे लागेल. ते करताना आपण स्वयंसिद्ध असल्याचा वात-पित्त-कफ व सप्तधातूंच्या विकारांवर शेकडो औषधे आहेत. ती औषधे नीट शिकविली जात नाहीत, त्यांचा नीट वापर होत नाही, म्हणून ही परिस्थिती आहे, असे म्हणण्याचा दुराग्रह सोडावा लागेल. हा दुराग्रह आमच्या पूर्वजांनी दाखविला. आधुनिक साधने, आधुनिक पद्धती आणि कसोटय़ांचा वापर केला नाही, म्हणूनच आयुर्वेदात संशोधन झाले नाही. कारण त्यांच्या दृष्टीने आयुर्वेद परिपूर्ण होता. तीच वृत्ती आजही तशीच राहिली तर आयुर्वेदाचा विकास हे एक दिवास्वप्नच राहणार आहे.
आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना आधुनिक निदान पद्धतीने रोगनिदान करण्यास विरोध हे याच वृत्तीचे द्योतक आहे. आयुर्वेद हे शास्त्र आहे. गिरनारचा दुर्मिळ होत चाललेला सिंह नव्हे की, ज्याला कुंपणात बंदिस्त करून संरक्षण आणि संवर्धन करता येईल. आयुर्वेदाला सर्व आधुनिक कसोटय़ांवर पारखून घेण्यासाठी आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यक आणि संपूर्ण निदान पद्धतीचे ज्ञान असायलाच हवे. ते शास्त्र आणि समाज या दोघांच्या हिताचे आहे.