नवी मुंबईतील ‘एमजीएम इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ सायन्सेस’ आणि ‘डी. वाय. पाटील विद्यापीठ’ या दोन वैद्यकीय अभिमत विद्यापीठांनी एकाच दिवशी आपल्या प्रवेश परीक्षा (सीईटी) ठेवल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच अडचण केली आहे.
अभिमत विद्यापीठांना सरकारच्या किंवा खासगी संस्थाचालकांच्या संघटनेतर्फे घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांमध्ये सहभागी न होता स्वतंत्रपणे परीक्षा घेऊन जागा भरण्याची मुभा आहे. त्यानुसार ही दोन विद्यापीठे आपल्या एमबीबीएसच्या प्रत्येकी १०० व दंतच्या प्रत्येकी १५० जागांकरिता स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा घेतात. परंतु, यंदा या दोन्ही विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा ११ मे रोजी घेण्यात येणार आहेत. यापैकी एमजीएमची परीक्षा दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे, तर डीवायची परीक्षा सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. या दोन परीक्षांच्या तारखांमध्ये केवळ एका तासाचे अंतर आहे. या एका तासात दुसऱ्या परीक्षेचे केंद्र कसे गाठायचे, यामुळे या दोन्ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच अडचण झाली आहे.
या दोघांपैकी एमजीएमने आपल्या परीक्षेची तारीख आधीच जाहीर केली होती, तर डीवाय पाटील विद्यापीठाने त्यांच्यानंतर आपल्या परीक्षेची तारीख जाहीर केली, असे एका पालकाने  सांगितले. इतकेच नव्हे तर डीवाय पाटील विद्यापीठाने प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची मुदत उलटल्यानंतर तीन दिवसांतच परीक्षा ठेवली आहे. ५ मे ही ‘डीवाय’च्या सीईटीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, तर विलंब शुल्कासह ती ८ मे अशी असणार आहे. त्यानंतर तीनच दिवसांत म्हणजे ११ मे रोजी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे, परीक्षेसाठीचे केंद्रही अद्याप विद्यार्थ्यांना कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे, हे सगळेच विचित्र आहे, अशी तक्रार एका पालकाने केली.
एमजीएमची परीक्षा देशस्तरावर ४० परीक्षा केंद्रावर होणार असून त्याला ५४ हजार विद्यार्थी बसणार आहेत, पण डीवाय पाटील विद्यापीठाचे प्र-कुलपती अजिंक्य पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न  केला असता तो होऊ शकला नाही. या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय ओक यांच्याशी संपर्क साधला असता परीक्षेच्या तारखांशी कुलगुरू म्हणून आपला काही संबंध नाही. तसेच या संबंधातील प्रश्नाचे उत्तर देणे आपल्या तत्त्वात बसत नाही, असे उत्तर त्यांनी दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मे महिन्यात परीक्षा घ्यायची आहे, पण देशभरात ३००-४०० विद्यापीठे आहेत. शिवाय सरकारी सीईटी वेगळ्या. त्यामुळे, कितीही टाळले तरी तीन-चार परीक्षा क्लॅश होतात. त्यातही आम्ही तीन ते चार महिने आधी तारीख जाहीर केली आहे.
– कमलकिशोर कदम, संचालक, एमजीएम

रेश्मा शिवडेकर, मुंबई</strong>