राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करताना परीक्षा अर्जावर आता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची नोंद केली जाणार आहे. यासाठी परीक्षा फॉर्मवर वाढीव रकाना समाविष्ट करण्याचा निर्णय सोमवारी एका बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षांपासून करण्यात येणार आहे.
अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांच्या दालनात झालेल्या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, अल्पसंख्याक विकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिव थँक्सी थेक्केकरा, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे, विविध अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष पी. ए. इनामदार आदी उपस्थित होते. एसएससी बोर्डाच्या परीक्षा अर्जावर एससी, एसटी, ओबीसी, एनटी आदी प्रवर्गाची माहिती भरली जाते. पण अल्पसंख्याकांची माहिती भरण्यासाठी या अर्जावर वेगळा रकाना नाही. त्यामुळे परीक्षेस किती अल्पसंख्याक विद्यार्थी बसले, किती उत्तीर्ण झाले आदी माहिती मिळविणे कठीण जाते. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज योजनांची अंमलबजावणी करतानाही अडचणी येत होत्या. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयांकडून अल्पसंख्याक असल्याचे प्रमाणपत्र मागितले जाते. आता एसएससी बोर्डाच्या अर्जावर अल्पसंख्याक असल्याची नोंद झाल्याने या शैक्षणिक योजनांचा लाभ मिळविणे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना सोपे जाणार आहे. अल्पसंख्याक समाजात मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख आणि पारशी या समाजाचा समावेश आहे.