धम्माल, मस्ती या बरोबरच तंत्रज्ञानातील गंमतीजंमती अनुभवण्याची संधी घेऊन येणारा ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’चा (आयआयटी) ‘मूड इंडिगो’ हा सांस्कृतिक महोत्सव शुक्रवारपासून (२६ डिसेंबर) संस्थेच्या पवई येथील निसर्गरम्य वातावरणात सुरू होत आहे.
‘मूड आय’ नावाने देशभरातील तरुणाईत प्रसिद्ध असलेल्या या सांस्कृतिक सोहळ्यात जादूगारांच्या हातचलाखीपासून संगणकाच्या कळफलकावरील जादूची गंमतही अनुभवता येते. या शिवाय २९ डिसेंबपर्यंत रंगणाऱ्या या ४४ व्या महोत्सवात २२ वेगवेगळय़ा सांस्कृतिक कार्यक्रमांची बहार असणार आहे.
देशभरातील दीड हजार महाविद्यालयांमधून सुमारे एक लाखांहून अधिक विद्यार्थी या महोत्सवाला भेट देतात. या वर्षी सुमारे २५०० महाविद्यालयांनी ‘मूड आय’ला हजेरी लावण्यासाठी नोंदणी केली आहे. तसेच, सुमारे २२० विविध कार्यक्रमांनी ‘मूड आय’ सजवण्यात आला आहे.
भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन यंदाच्या ‘मूड-आय’मध्ये घडविण्याचा प्रयत्न आहे. संगीत, खाद्य महोत्सव, यू-थिएटर, आदींच्या माध्यमातून तैवानचे मार्शल आर्ट, तालवाद्यांचे फ्युजन, यू-थिएटर, संगीत अशा विविध नयनरम्य व श्रवणीय अनुभूती देणारे कार्यक्रम असणार आहेत.
‘अ व्हिंटेज अफेअर’ ही यंदाच्या ‘मूड-आय’ची थीम आहे. त्यासाठी जुन्या छत्र्या, टेलिफोन, अवाढव्य मोनोप्लेन, लाल रंगाचे टेलिफोन बूथ आणि मुलांनी तयार केलेल्या व्हिंटेज कार यांनी ‘आयआयटी’चे संकुल सजवून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न आहे, असे ‘मूड-आय’ची प्रसिद्धीप्रमुख असलेल्या गुंजन शर्मा हिने सांगितले.
या शिवाय ‘मूड आय’चे संकेतस्थळ, अ‍ॅप, ‘आरएफआयडी प्रोजेक्ट’च्या साह्याने ‘किऑस्क’वरून करता येणाऱ्या तांत्रिक करामती हे या वेळचे वैशिष्टय़ असणार आहे.