महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेतील मराठी आणि इंग्रजी या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेतील ९० गुणांच्या प्रश्नांचे स्वरूप सारखे असताना व्याकरणावरील प्रश्नांचे स्वरूप वेगळे का, असा प्रश्न परीक्षार्थीकडून विचारला जात आहे.
३० मे ते १ जून दरम्यान एमपीएससीची मुख्य परीक्षा पार पडली. यात मराठी आणि इंग्रजी यांच्या १०० गुणांसाठी झालेल्या परीक्षेत प्रत्येकी १० गुणांचे प्रश्न व्याकरणावरील होते. मराठीच्या व्याकरणावरील प्रश्नाला चार पर्याय दिलेले होते. त्यापैकी एक योग्य पर्याय निवडायचा होता. पण, इंग्रजीच्या प्रश्नांना असे कोणतेही पर्याय दिले गेले नव्हते.
त्यामुळे, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडविणे तुलनेत कठीण केले, असा काही उमेदवारांचा आक्षेप आहे. दोन्ही भाषा विषयांच्या परीक्षेत निबंध, सारांशलेखन, भाषांतर यांचा समावेश होता. त्यांचे गुणांचे वाटपही सारखेच होते. शिवाय व्याकरणावरील प्रश्नांनाही दोन्हीकडे प्रत्येकी १० गुण राखून ठेवले होते. असे असताना प्रश्नांचे स्वरूप वेगळे ठेवण्याचे कारण काय, असा सवाल एका उमेदवाराने केला आहे. एमपीएसी च्या परिक्षेविषयीचा घोळ दरवर्षीच असतो. तो संपायला तयार नाही.