मुंबई आणि कोकणात १७ आणि २४ एप्रिलला मतदान होणार असल्याने मुंबई विद्यापीठाला सुमारे साडेचारशेहून अधिक विषयांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागणार आहेत. १६ व्या लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठ , सीबीएसईपाठोपाठ पुणे विद्यापीठानेही परीक्षा पुढे ढकलणार असल्याचे जाहीर केले आहे.
मुंबईत २४ एप्रिलला तर रत्नागिरीत १७ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे, या दिवशीच्या परीक्षा विद्यापीठाला परीक्षा घेणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया परीक्षा नियंत्रक पद्मा देशमुख यांनी दिली. परिणामी या दोन्ही दिवशीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. १७ आणि २४ एप्रिलसह १६ आणि २३ एप्रिलच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. कला शाखेच्या २२६, वाणिज्यच्या ६८, सायन्सच्या १६६ तर तंत्रज्ञान शाखेच्या १६ विषयांच्या परीक्षा मतदानाच्या दिवशी होणार होत्या. मात्र, आता त्या पुढे ढकलाव्या लागतील. आढावा घेऊन सुधारित तारखा जाहीर करण्यात येतील, असे देशमुख यांनी सांगितले.

‘सीबीएसई’च्या १२ वीच्या परीक्षांवरही परिणाम
मुंबई : देशभरात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’ने (सीबीएसई) आपल्या ९, १०, १२ आणि १७ एप्रिल रोजी होणाऱ्या आपल्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ९ एप्रिलला संगीत, उर्दू इलेक्टीव्ह आणि उर्दू कोअर या विषयांची होणारी परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार २५ एप्रिलला, १० एप्रिलची परीक्षा २१ एप्रिलला, १२ एप्रिलला होणारी परीक्षा १९ एप्रिलला होणार आहे. १७ एप्रिलची परीक्षा २२ एप्रिलला होणार आहे.

मात्र पदव्युत्तर परीक्षांच्या वेळापत्रकावर परिणाम नाही..
पुणे विद्यापीठाच्या १७ आणि २४ एप्रिलच्या परीक्षा मतदानामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. मात्र, पदव्युत्तर परीक्षा मतदानानंतर असल्यामुळे त्यांवर परिणाम होणार नाही. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी १० तारखेच्याही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. १७ आणि २४ एप्रिलला मतदान होणार आहे. या दिवशी असलेल्या परीक्षा पुढे ढकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले. राज्यात १० एप्रिलला प्रामुख्याने विदर्भातील जिल्ह्य़ांमध्ये मतदान होणार आहे. पुण्यात बाहेरगावाहून आणि परराज्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे १० तारखेची परीक्षाही पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. मात्र, विद्यापीठाच्या क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्य़ांव्यतिरिक्त इतर ठिकाणी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी म्हणजे १० तारखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार नसल्याचेही डॉ. गाडे यांनी सांगितले. विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षाच या दरम्यान होणार आहेत. सर्व शाखांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या आणि अभियांत्रिकी, व्यवस्थापन अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा या मतदानानंतर असल्यामुळे विद्यापीठावर परीक्षांचा फारसा ताण येण्याची शक्यता नाही. पुढे ढकलण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत स्वतंत्रपणे सूचना देण्यात येईल, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले.