अनेक शाळांमध्ये पर्यावरणविषयक उपक्रम राबविले जातात, पण त्या उपक्रमांचा मुलांच्या मनावर किती खोलवर परिणाम झालाय यावरून त्याचे यश सिद्ध होते. अनेकदा हे उपक्रम करायचे म्हणून केले जातात. त्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम दिसून येत नाहीत. अकोल्याचे ‘नवावा स्वावलंबी विद्यालय’ मात्र याला अपवाद म्हणायला हवे. पर्यावरणाची चर्चा सर्वत्र होताना दिसते, पण ही चर्चा प्रत्यक्ष कृतीत उतरत नाही. ‘नवावा स्वावलंबी शाळे’ने मात्र या क्षेत्रात केलेले काम लक्षणीय आहे. २००४मध्ये वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ) या पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून शाळेने पर्यावरणविषयक उपक्रमांना सुरुवात केली आणि निसर्गप्रेमाचे बीज विद्यार्थ्यांच्या मनात रोवले गेले. हे उपक्रम राबविणारी ही अकोल्यातील पहिली शाळा होती. या शाळेने घडविलेले लहान निसर्गरक्षक आता या परिसरात पर्यावरण संवर्धनात मोलाचा वाटा उचलत आहेत.
शाळेच्या दीड हजार विद्यार्थ्यांनी २००४मध्ये वनसंवर्धन दिनानिमित्त पर्यावरण बचाव रॅली काढली तेव्हा पर्यावरण हा विषय अकोलेकरांसाठीही नवीन होता. २००५-०६मध्ये केंद्र सरकारने शालेय विद्यार्थ्यांकरिता इको क्लब सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शाळेला वार्षिक अडीच हजार मिळणार होते. त्यामुळे शाळेला आणखीनच उभारी मिळाली.
प्रेम अवचार हा नुकताच बारावी झालेला विद्यार्थी इयत्ता सहावीत असताना विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाला. तेव्हापासून तो पर्यावरण जागृतीचे काम करतो आहे. दहावीची परीक्षा आटोपल्यानंतर उन्हाळ्यात त्याने थेट मेळघाट गाठून निसर्ग शिक्षण देणाऱ्या डुडा व्हॅनसोबत दहा आदिवासी गावांना भेटी दिल्या व पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगितले. त्याला पर्यावरण क्षेत्रातच आपले करिअर करायचे आहे. शाळेच्या तेजस्विनी रापतींवार या विद्यार्थिनीला १००पेक्षा जास्त पक्ष्यांची ओळख असून ती उत्तम पक्षी निरीक्षक आहे. सौरभ मारोठे या विद्यार्थ्यांने उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध प्रजातींच्या दहा हजाराहून अधिक बिया जमा करून आपल्या पर्यावरण प्रेमाची साक्ष दिली. वृक्षदत्तक योजना, पर्यावरणपूरक उत्सव, प्लॅस्टिक बॅगेला नाही म्हणा आदी उपक्रमांतून शाळेचा हरित सैनिक पर्यावरण जागृतीत खारीचा वाटा उचलतोय.
शाळेची मुले गावातील यात्रेत, मंदिरात जमा झालेली फुले नदीत टाकण्यास गावकऱ्यांना मज्जाव करतात. त्याऐवजी ही फुले शेतीच्या धुऱ्यावर टाकण्याची विनंती गावकऱ्यांना केली जाते. शाळेच्या काही मुलांनी मेळघाटातील गावातून चार ते पाच टन प्लॅस्टिक एकत्र केले. मोठय़ा शहरातून निघालेले प्लॅस्टिक या ना त्या मार्गाने आदिवासी गावांपर्यंत कसे पोहोचले आहे, याचे प्रत्यंतर या निमित्ताने आले.
शाळेच्या अक्षय बुंदेले या हरित सैनिकाने राबविलेल्या उपक्रमाचा विशेष उल्लेख करायला हवा. अक्षयने १४० पोत्यांचा पुनर्वापर करून शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिसामासा गावी वनराई बंधारा बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दुर्मीळ होत असलेल्या तणमोर पक्ष्यांचा या भागात अधिवास आहे. बंधाऱ्याचा या पक्ष्यांच्या जतनासाठी मोठा उपयोग झाला. अशा अनेक प्रकल्पांमधून शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनात खारीचा वाटा उचलला आहे. शाळेने आठ वर्षांपूर्वी जाणीवपूर्वक रोवलेले हे बियाणे सकारात्मक परिणाम घेऊन आता तरारून वर आले आहे.
समन्वयक इको क्लब, नवावा स्वावलंबी विद्यालय, अकोले संपर्क – ९०११५८७६५५
कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे  उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी. संपर्कासाठी पत्ता- ‘चिरंतन शिक्षण’ लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१.
दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७  
reshma.murkar@expressindia.com,  reshma181@gmail.com