शाळांमधील पटनोंदणी, शिक्षकांची संख्या यांची जशी वार्षिक तपासणी होते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेतील वातावरण किती प्रतिकूल आहे, याचीही तपासणी दर दोन वर्षांनी व्हायला हवी, असा प्रातिनिधिक सूर मुलांच्या सुरक्षिततेवर आयोजिण्यात आलेल्या ‘शिक्षण कट्टा’ या अनौपचारिक चर्चेत उमटला.

‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’च्या शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून ‘शिक्षण कट्टा’ या अनौपचारिक चर्चेचे आयोजन करण्यात येते. यात मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी, संबंधित विषयातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांना सहभागी करून घेतले जाते. या वेळी ‘आपली मुले किती सुरक्षित आहेत?’ या विषयावर कट्टय़ावर चर्चा करण्यात आली. शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने या चर्चेत पुढे आलेले मुद्दे अहवालाच्या स्वरूपात एकत्र करून राज्य सरकारला सादर केले जातात.

विद्यार्थ्यांच्या शारीरिकच नव्हे तर मानसिक, भावनिक अशा विविध प्रकारच्या अंगाने शाळेतील सुरक्षेच्या विचार या वेळी करण्यात आला. विद्यार्थ्यांची शाळेत किंवा अन्यत्र होणारी लैंगिक छळवणूक, एखाद्या गुन्ह्य़ाकरिता केल्या जाणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या शिक्षा, बसगाडय़ांमधून ये-जा करताना येणाऱ्या अडचणी, अभ्यासाचा ताण, समवयस्कांकडूनच होणारी मारहाण, चोऱ्या, रॅिगग याशिवाय शाळेत वावरताना येणारे सुरक्षिततेचे प्रश्न अशा कितीतरी मुद्दय़ांवर या वेळी चर्चा करण्यात आली. यात राज्य शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष वसंत काळपांडे, माजी शिक्षण निरीक्षक बसंती रॉय, बालमानसोपचारतज्ज्ञ समीर दरवाई, ‘प्रथम’च्या संस्थापक सदस्य फरिदा लांबे, मुख्याध्यापिका सुचेता भवाळकर, मुख्याध्यापक मिलिंद चिंदरकर, ज्यूड फर्नाडिस आदी सहभागी झाले होते.

यात प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया, सेलफोन आदींचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम गंभीर असल्याचे मत एका शिक्षकांनी व्यक्त केले. तर काही ठिकाणी शिक्षकांशी विद्यार्थ्यांचा संवाद कमी झाल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी कळत नाही, असे मत एका मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या समस्या हाताळण्यासाठी शिक्षकांमध्ये संवाद साधण्याचे कौशल्य विकसित करण्याची गरज लांबे यांनी व्यक्त केली. तर शाळांच्या दहावीचा निकाल फुगविण्यासाठी विद्यार्थ्यांना नववीत अनुत्तीर्ण करण्याच्या मुद्दय़ावरून १०० टक्के निकाल जाहीर करण्याची पद्धतच बंद करण्यात यावी, अशी सूचना डॉ. दलवाई यांनी केली.
आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीतही जागरूकता नसल्याचे दाखवून देण्यात आले.