एमबीबीएस आणि बीडीएसप्रमाणेच बी.व्ही.एस्सी. अ‍ॅण्ड ए.एच. या अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. मे महिन्यात होणाऱ्या नीट परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि बीडीएसमध्ये प्रवेश घेता येईल. त्याचबरोबर महाराष्ट्र पशु व  मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ व्हेटर्नरी सायन्सेस अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हज्बंड्री(बीव्हीएस्सी आणि एएच) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट
द्यावी लागणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाने वेळोवेळी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. नवी दिल्लीच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत(सीबीएसई) नीट घेतली जाणार आहे.
भारतीय वैद्यक परिषद आणि भारतीय दंत परिषदेने अनुक्रमे एमबीबीएस आणि बीडीएससाठी नीटची अधिसूचना दिलेली आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या निकष व निर्देशानुसार नीटद्वारेच बी.व्ही.एस्सी. अ‍ॅण्ड एएच या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी यापूर्वी वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी या सामाईक पात्रता परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होता. परंतु २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालयानेही नीटद्वारेच प्रवेश परीक्षा घेण्यास मान्यता दिली.
विद्यापीठाचे मुख्यालय नागपुरात तर इतर जिल्ह्य़ांत महाविद्यालये आहेत. मुंबईचे पशुवैद्यक महाविद्यालये, नागपूर, शिरवळ, परभणी आणि उद्गीर येथे बी.व्ही.एस्सी. अ‍ॅन्ड ए.एच.या पदवी अभ्यासक्रम शिकवले जातात.
दिल्लीच्या भारतीय पशुवैद्यक परिषदेने निकष व निर्देशानुसार यापुढे नॅशनल इलिजिब्लिटी एन्ट्रान्स टेस्ट(नीट) द्वारे विद्यापीठ संचालित
पशुवैद्यक महाविद्यालयात बी.व्ही.एस्सी आणि ए.एच. या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जाणार आहेत.