शीव येथील ‘वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालया’तील गैरप्रकारांबाबत माध्यमांतून येणाऱ्या उलटसुलट वृत्तांमुळे राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे मित्र व नातेवाईकांनी त्यांच्या नावाला बट्टा नको, असे म्हणत मुंबई विद्यापीठ  कुलगुरुंनाच साकडे घातले आहे.
सहकार चळवळीचे शिल्पकार म्हणून वसंतदादांना ओळखले जाते. शैलजा प्रकाशबापू पाटील या दादांच्या स्नुषा. शीवच्या वसंतदादांच्या नावाने असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाशी पाटील कुटुंबीयांचा कोणताही संबंध नाही. पण, तेथे नियम डावलून आणि कायदा पायदळी तुडवून अनेक गैरप्रकार होत असल्याची चर्चा प्रसारमाध्यमातून होते आहे. या पाश्र्वभूमीवर शैलजा पाटील यांनी हे महाविद्यालय चालविणाऱ्या संस्थेच्या अध्यक्ष आशालता फाळके यांना पत्र लिहून तक्रारही केली होती. आता दादांच्या सहकाऱ्यांनी कुलगुरू राजन वेळुकर यांची भेट घेऊन दादांच्या नावाचा गैरवापर त्वरित थांबविण्याची मागणी केली आहे.
‘लोकसत्ता’त छापून आलेल्या एका बातमीचा संदर्भ शैलजा पाटील यांनी पत्रात दिला आहे. या बातमीवरून दादांच्या नावाने असलेल्या महाविद्यालयात हे गैरप्रकार कसे चालतात, अशी विचारणा आपल्याला होत आहे, असे स्पष्ट करत पाटील यांनी दादांच्या नावाचा गैरवापर असाच चालू राहिल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.
वसंतरावांचे राजकीय सल्लागार दत्ताजी देसाई, रमेश भोसले, यशवंत हाप्पे, बाबुराव पोटे आदी सहकाऱ्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन संस्था प्रामाणिकपणे चालविता येत नसेल तर दादांचे नाव बदलून दुसऱ्या नावाने संस्था चालवावी, अशी मागणी केली आहे. खोटी माहिती सादर करून शुल्कवाढ करणे, अनधिकृत बांधकाम करणे, भरमसाठ शुल्क आकारूनही अपुऱ्या सुविधा देणे, सरकारकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीचा भाडेकरार संपूनही तेथे संस्था चालविणे आदी अनेक कारणांसाठी ही संस्था चर्चेत आहे. या सर्व तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून अहवाल आल्यानंतर कार्यवाही करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी संबंधितांना दिले आहेत.