ठाण्यातील महापालिकेच्या शाळा क्रमांक ७मध्ये इंग्रजी माध्यमाच्या दुसरीच्या वर्गासाठी सध्या शिक्षकच नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या पालाकांसोबत मंगळवारी शिक्षक मिळण्यासाठी महापालिका  शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी आठवडाभरात शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.
ठाणे महापालिकेने पाच वर्षांपूर्वी इंग्रजी माध्यमाच्या पाच शाळा सुरू केल्या. त्यामध्ये आणखी एका शाळेची भर पडली असून मानपाडा, मनोरमानगर, टेंभीनाका, उथळसर, मुंब्रा, किसननगर येथे या शाळा आहेत. या शाळांमध्ये पहिली ते आठवीचे ४५ वर्ग भरले जात असून त्यामध्ये १४०० विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ५० शिक्षकांची पदे मंजूर असताना केवळ ३६ शिक्षक सध्या कार्यरत आहेत. टेंभीनाका येथील शाळा क्र. ७ मध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी शिक्षक उपलब्ध होत नसल्याने पालकांनी संतप्त होत विद्यार्थ्यांसह शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घातला. गेल्या वर्षीही या विद्यार्थाना सहा महिने शिक्षक नव्हते, असे पालकांनी  यावेळी सांगितले. शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी एका आठवडय़ात पर्यायी शिक्षक नेमण्याचे अश्वासन पालकांना दिले, तसेच १६ शिक्षक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. दोन महिन्यात हे शिक्षक सेवेत रुजू होणार असल्याचेही ते म्हणाले.