प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी ‘नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट’ (नेट) यापुढे केंद्रीय शिक्षण मंडळ (सीबीएसई) घेणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी आयोगाकडून नेट घेण्यात येते. १९८९ सालापासून आयोग नेट परीक्षा घेत आहे. मात्र, आयोगावरील कामाचा आणि जबाबदाऱ्यांचा ताण वाढल्यामुळे आता सीबीएसईकडून नेट घेण्यात येणार आहे. मात्र, या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी, उत्तरपत्रिकांच्या तपासणी करण्यासाठी, अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी आयोगाकडूनच तज्ज्ञ नेमले जातील. त्यामुळे सीबीएसईने परीक्षा घेतली, तरी ती फक्त परीक्षा घेणारी यंत्रणा म्हणून काम करणार आहे. डिसेंबरमध्ये होणारी परीक्षा ही सीबीएसईच्या माध्यमातून घेण्यात येईल, असे आयोगाचे उपाध्यक्ष एच. देवराज यांनी सांगितले.
देवराज ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, ‘‘आयोगाकडे खूप जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे नेट परीक्षेचे काम बाहेरील संस्थेला देण्याचे आयोगाच्या विचाराधीन होते. ही परीक्षा घेण्याची सीबीएसईने तयारी दाखवली. सीबीएसईला परीक्षांच्या नियोजनाचा अनुभव आहे. त्यामुळे सीबीएसईची निवड करण्यात आली आहे. मात्र, परीक्षांसाठी तज्ज्ञांची निवड आयोगाकडून करण्यात येईल.’’