देशभरातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर आता गृहखाते लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी गृहविभागाने नवीन संगणकप्रणाली तयार केली असून त्यावर आपल्याकडील परदेशी विद्यार्थ्यांची माहिती भरणे देशातील सर्व शिक्षणसंस्थांना सक्तीचे करण्यात आले आहे. मार्चअखेपर्यंत देशभरातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
देशभरातील विविध शिक्षणसंस्थांमध्ये मोठय़ासंख्येने परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या आणि देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने गृह विभागाने सर्व विद्यार्थ्यांची माहिती एकत्रित ठेवण्याची योजना आखली आहे. परदेशी विद्यार्थ्यांच्या हालचालींवर आता गृह विभाग आणि मनुष्यबळ विभाग लक्ष ठेवणार आहे. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स योजनेअंतर्गत ‘फॉरेन स्टुडंट्स इन्फर्मेशन सिस्टिम’ ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. देशभरातील शिक्षणसंस्थांनी त्यांच्याकडील परदेशी विद्यार्थ्यांची माहिती या ऑनलाईन प्रणालीवर भरायची आहे. विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती, त्याच्या कुटुंबीयांची प्राथमिक माहिती, त्याचा अभ्यासक्रम, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा अपेक्षित कालावधी, शैक्षणिक प्रगती, विविध उपक्रमांमधील सहभाग, इतर हालचाली अशी माहिती शिक्षणसंस्थांनी भरायची आहे. शिक्षणसंस्थांबरोबरच परदेशी नागरिक केंद्रांनीही त्यांच्याकडील माहिती या प्रणालीवर भरायची आहे. या सर्व माहितीचा एकत्रित डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. सध्या मुंबई, दिल्ली, बेंगलोर, हैद्राबाद, अमृतसर, कोलकाता, कोची, कोझीकोडे, तिरुअनंतपूरम, लखनऊ आणि गोवा या ठिकाणी प्राथमिक स्तरावर हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

अशी काम करणार संगणकप्रणाली
ज्या शिक्षणसंस्था परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देतात त्यांनी परदेशी नागरिक केंद्रामध्ये नोंदणी करायची आहे. त्यानंतर प्रत्येक शिक्षणसंस्थेला यजर आयडी आणि पासवर्ड देण्यात येणार आहे. प्रत्येक शिक्षणसंस्थेला आणि विद्यार्थ्यांला एक युनिक आयडी देण्यात येणार आहे. परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना शिक्षणसंस्थेने या प्रणालीवर त्याची माहिती नोंदवायची आहे. या आयडीच्या माध्यमातून शिक्षणसंस्था किंवा परदेशी नागरिक केंद्रामध्ये माहिती उपलब्ध होऊ शकेल. किमान तीन महिन्यांतून एकदा विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करायची आहे.