मुंबई महानगर प्रदेश परिसरात राबविल्या जाणाऱ्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठीचे संकेतस्थळ २४ एप्रिलपासून सुरू होणार आहे. http://fyjc.org.in/mumbai या संकेतस्थळावर या प्रवेशांबाबतची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना मिळेल.
विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज दोन भागात विभागलेला आहे. पहिल्या भागामध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरावयाची आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेच्या मदतीने आपल्या अकरावी प्रवेशाचा वैयक्तिक माहितीचा भाग वरील संकेतस्थळावर ऑनलाइन भरून घ्यावा. दुसरा भाग (पसंतीक्रम) हा विद्यार्थ्यांसाठी एसएससी मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच संकेतस्थळावर सुरू होणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी दुसऱ्या भागाचा (पसंतीक्रम) सराव माहिती पुस्तिकेतील नमुना प्रवेश अर्जाच्या मदतीने करावा.
विद्यार्थ्यांनी लॉगइन आयडी, पासवर्ड व महाविद्यालयाच्या संकेतक्रमांकासह नमुना प्रवेश अर्ज असणारी अकरावी प्रवेश माहिती पुस्तिकेची छापील प्रत १५० रुपये देऊन मुंबई महानगर क्षेत्रातील आपापल्या माध्यमिक शाळेतून मिळविता येईल.
 या माहिती पुस्तिका सर्व माध्यमिक शाळांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारच्या http://www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर पाहावयास उपलब्ध आहेत.