शाळेने सांगितलेले शुल्क भरा, अन्यथा विद्यार्थ्यांला शाळेतून काढून टाकले जाईल, असा पवित्रा घेतलेल्या बोरिवली येथील जेबीसीएन आंतरराष्ट्रीय शाळेसमोर गुरुवारी पालक आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेसमोर निदर्शने केली. या वेळी १० दिवसांत याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन देण्यात आले. जे पालक हे शुल्क भरणार नाहीत अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू, असा इशारा शाळा व्यवस्थापनाने दिला होता. शाळेच्या या कारभाराविरोधात शुल्कवाढ रद्द करा, विद्यार्थ्यांमधील भेदभाव दूर करा आणि ४० विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्या, अशा घोषणा करत शाळेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी शाळेच्या विश्वस्त फातिमा आगरकर आणि मुख्याध्यापक चटर्जी यांनी वरिष्ठांशी चर्चा करून १० दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याचे मनविसेचे विद्यापीठ सरचिटणीस संतोष गांगुर्डे यांनी स्पष्ट केले.