अनेक ठिकाणी खेडय़ातील मुलेदेखील वेगवेगळ्या कारणांनी शहरातील खाजगी शाळांकडे प्रवेश घेण्यास उत्सुक असतात; परंतु डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या वाडय़ावस्त्यांमधील मुलांना नावीण्यपूर्ण, उपक्रमशील, जीवनकौशल्ये विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम राज्यातील काही जिल्हा परिषदेच्या शाळा करीत आहेत. त्यातीलच एक सातारा तालुक्यातील नव्याने स्थापना झालेली कामथी येथील पवारबाबरवस्ती ही शाळा.
कामथीपासून दोन किलोमीटर अंतरावर पवारबाबरवस्ती ही सुमारे २५० इतकी लोकसंख्या असलेली छोटी वस्ती. गाव व वस्ती यांच्यामध्ये मोठा ओढा असल्याने पावसाळ्यात शाळेत जाताना मुलांचे हाल होतात. २०११मध्ये या शाळेची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शिक्षकांकडून अनेक उपक्रम राबविले जातात.
माझी कला- मुलांना दररोज एक तास ग्रामस्थांच्या मदतीने तबला आदी वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रजासत्ताक दिन, गणेशोत्सव अशा कार्यक्रमांचे औचित्य साधून या उपक्रमांतर्गत मुले विविध कला सादर करतात.
पाठांतर- मुलांना संग्रहित केलेल्या कविता, श्लोक, गीते पाठांतरासाठी दिली जातात. त्यासाठी भ्रमणध्वनीचा वापर केला जातो. पाढेही असेच पाठ करून घेतले जातात. यामुळे मुले पाठांतराला कंटाळत नाहीत.
हस्ताक्षर- मुलांचे हस्ताक्षर सुधारावे यासाठी शाळेतर्फे नेहमीच प्रयत्न केले जातात. मुलांना नेहमी लेखनाचा कंटाळा असतो. पण शाळेच्या फरशीवरची पाटी, हा फळा माझा, छान अक्षर ज्याचे रंगीत खडू त्याचे अशा उपक्रमामुळे मुलांना लेखनाची गोडी लागली आहे.
मीच माझा आदर्श- मुलांना चांगल्या सवयी, स्वच्छता, नियमितपणा या सवयी लागण्यासाठी ‘मीच माझा आदर्श’ ही संकल्पना राबविली जाते. दररोज वेळेत उपस्थिती, गणवेश, गृहपाठ, डबा, आरोग्य, स्वच्छता या सर्व बाबी असणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण देऊन त्यातून आदर्श विद्यार्थी निवडला जातो.
कार्यशाळा- दर महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या वस्तू एकत्र करून कार्यशाळा घेतली जाते. यात राख्या, मातीचे गणपती, इतर वस्तू, कात्रणांचा संग्रह, रुमाल, कमी खर्चात ओळखपत्र आदी उपक्रम राबविले जातात. यातून मुलांची जीवनकौशल्ये विकसित होण्यासाठी प्रयत्न केले जातात.
निसर्ग माझा गुरू- डोंगरकपारीत वस्ती असल्याने ‘डोंगरातील शाळा’ या उपक्रमातून झाडांची, प्राण्यांची नावे, धरण, नदी, डोंगर, माती, शेती, आकाश, ढग यांचे निरीक्षण मुलांनी करावे हे अपेक्षित असते. मुलांनी केलेल्या निरीक्षणावर परिपाठावेळी चर्चा घेतली जाते. यातून विज्ञानातील गाभाभूत घटक सहज लक्षात येऊन स्मरणात राहतात.
याशिवाय पालकांचा सहभाग म्हणून प्रदर्शन व पालक मेळावा घेतला जातो. यानिमित्ताने एकत्र आलेल्या महिला हळदी-कुंकू, सुगरणीचा पदार्थ, घरगुती औषधे असा खजाना सहजपणे मुलांना देऊन जातात. आमची वस्ती लहान असली तरी शाळेतील मुलांना मोठी स्वप्ने पाहण्याची सवय लावण्याचा आमचा प्रयत्न असतो. यासाठी पालकवर्ग, अधिकारी यांचीदेखील मोलाची साथ मिळत आहे.

कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आपल्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे  उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी. संपर्कासाठी पत्ता- ‘चिरंतन शिक्षण’ लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१.
दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७  
reshma.murkar@expressindia.com,  reshma181@gmail.com