मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या नियुक्तीलाही उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर ३ जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसह कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीलाही याच याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. सुरेश पाटीलखेडे यांनी नवनियुक्त कुलगुरूंच्या नियुक्तीला आव्हान दिले आहे. सोमवारी ही याचिका करण्यात आली. यापूर्वी माजी कुलगुरू राजन वेळुकर यांच्या नियुक्तीला आव्हान देण्यात आले होते. त्याप्रकरणी उच्च न्यायालयाने निकालानंतर वेळुकर यांना कामापासून दूर राहण्याचे आदेश राज्यपालांनी दिले होते. वेळुकर हे कुलगुरुपदासाठी पात्र नसताना त्यांची नियुक्ती करण्यात आली होती; तर देशमुख यांची नियुक्ती करताना यूजीसीच्या नियमांना बगल देण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. देशमुख यांची नियुक्ती ही महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम १२ नुसार करण्यात आली आहे; तर सर्वोच्च न्यायालयाने कुलगुरू नियुक्तीसाठी यूजीसीच्या नियमांचे पालन बंधनकारक केलेले आहे.
त्यामुळे ही नियुक्ती करताना या नियमांना पूरक असेल अशी सुधारणा कलम १२ मध्ये करणे आवश्यक बदल सरकारने करणे अपेक्षित होते. परंतु असे बदल न करताच त्यांची नियुक्ती केली गेली आहे. त्यामुळे ती चुकीची आहे, असा दावा आहे.