निम्मा ऑक्टोबर महिना लोटला, दिवाळी सुरू झाली तरीही पालिका शाळांमधील पूर्वप्राथमिक शिक्षकांना सप्टेंबरचे वेतन मिळालेले नाही. आजतागायत एकदाही या शिक्षकांना दिवाळीचा बोनसही देण्यात आलेला नाही. सुरुवातीला दोन वर्षे कंत्राटावर घेऊन नंतर त्यांना सेवेत कायम करण्याच्या वचनालाही प्रशासनाने हरताळ फासला आहे. गेल्या महिन्याच्या वेतनापासून वंचित राहिलेल्या या शिक्षकांवर दिवाळी अंधारातच साजरी करण्याची पाळी आली आहे. कारकून मंडळी निवडणुकीच्या कामाला गेल्याची सबब पुढे करून प्रशासनाने या शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवले आहे.पालिका शाळांतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि पटसंख्या राखण्यासाठी प्रशासनाने पूर्वप्राथमिक म्हणजेच शिशु वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि २००७मध्ये शिक्षकांची भरती करण्यात आली. सुरुवातीला दोन वर्षे कंत्राटावर घेऊ आणि नंतर सेवेत कायम करू, असे आश्वासन मुलाखतीसाठी आलेल्या शिक्षकांना देण्यात आले. त्यामुळे खासगी शाळेतील नोकरीला रामराम ठोकूनही अनेक शिक्षक कंत्राटावर पालिकेच्या सेवेत रुजू झाले. त्यामध्ये काही अपंग शिक्षकांचाही समावेश होता. पालिकेची नोकरी मिळाली म्हणून या शिक्षक त्यावेळी सुखावले होते. मात्र दोन वर्षे लोटली तरी सेवेत कायम करण्याचे नाव कुणीच काढत नव्हते. ज्युनिअर, सीनिअर केजीतील मुलांच्या देखभालीची मोठी जबाबदारीही याच शिक्षकांना पार पाडावी लागत होती. अनेक समस्यांना तोंड देत गेली सात वर्षे केवळ महिना पाच हजार वेतनावर या शिक्षिका कच्च्याबच्च्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. मात्र या स्थितीमुळे या शिक्षिका कमालीच्या अस्वस्थ झाल्या. वय उलटून गेल्यामुळे दुसरी नोकरी मिळत नाही आणि तुटपुंजे वेतन असूनही पालिकेची नोकरी सोडता येत नाही, अशा पेचात या शिक्षिका अडकल्या आहेत.मंगळवारपासून दिवाळी सुरू होत आहे. परंतु या शिक्षिकांना सप्टेंबरचे वेतन अद्याप मिळालेले नाही. वेतन मिळत नसल्याने काही शिक्षिकांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. सर्व कारकून निवडणुकीच्या कामासाठी गेल्यामुळे वेतन काढता आलेले नाही. वेतन नाही आणि बोनस तर मिळतच नाही त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची, या पेचात या शिक्षिका अडकल्या आहेत.संसाराचे गाडे चालणार कसे?पालिका सेवेत कायम होण्याची शक्यता धूसर बनत असताना गेल्या काही वर्षांपासून या शिक्षिकांना वेतनही वेळेवर मिळेनासे झाले आहे. वेतन मिळविण्यासाठी या शिक्षिकांनाच पालिका विभाग कार्यालय आणि मग दादरच्या हिंदू कॉलनीतील शिक्षण विभागाच्या कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. मुख्याध्यापक, विभाग कार्यालयातील कारकून विभाग अधिकारी, शिक्षण विभागातील मुख्य अधिकारी यांची स्वाक्षरी झाल्यानंतरच वेतन हाती पडते. त्यासाठी शिक्षिकांनाच धावपळ करावी लागते. इतके करूनही कधी १५, तर कधी २० तारखेला शिक्षिकांना वेतन मिळत आहे. त्यामुळे या शिक्षिकांना आपल्या संसाराचे गाडे कसेबसे पुढे रेटावे लागत आहे.