शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षक पात्रता परीक्षेच्या माध्यमातूनच भरती करणे बंधनकारक आहे. बदलत जाणारे अभ्यासक्रम, वाढती स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या बदलत चाललेल्या शैक्षणिक गरजा या सगळ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सक्षम शिक्षकांची निवड करणे, हा या परीक्षेमागील उद्देश आहे.
शिक्षणशास्त्राच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना परीक्षा द्यावी लागत असली, तरी स्पर्धा परीक्षेची सवय तुलनेने कमी असते. त्यामुळे या परीक्षेची तयारी कशी करायची, शेवटच्या वीस दिवसांमध्ये उजळणी कशी करायची, प्रत्यक्ष परीक्षा देताना काय काळजी घ्यायची, अडीच तासांमध्ये दीडशे प्रश्न कसे सोडवायचे, प्रत्येक विषयाचा नेमका अभ्यास कसा करायचा, या परीक्षेतून नेमके काय पाहिले जाणार आहे, अशा काही मुद्दय़ांचा आढावा आपण या सदरामध्ये घेणार आहोत.
शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरांवर घेतली जाणार आहे. प्राथमिक स्तर (पेपर एक) आणि उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन). इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी प्राथमिक स्तराची आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गासाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी दुसरी परीक्षा आणि दोन्ही स्तरांवर अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी दोन्ही पेपर देणे आवश्यक आहे. एक पेपर हा दीडशे (१५०) गुणांचा आहे. एका प्रश्नाला एक गुण याप्रमाणे दीडशे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येणार आहेत. म्हणजे दिलेल्या चार पर्यायांपैकी एक पर्याय उमेदवाराने निवडायचा आहे. अशा प्रकारे अडीच तासांमध्ये हे दीडशे प्रश्न  सोडवायचे आहेत. त्यामुळे वेळेचे नियोजन हा या परीक्षेतील महत्त्वाचा घटक आहे.
या परीक्षेसाठी (निगेटिव्ह मार्किंग)ची पद्धत नाही. प्राथमिक स्तरावरील परीक्षेसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा, परिसर अभ्यास, गणित हे विषय आहेत. उच्च माध्यमिक स्तरावरील परीक्षेसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, प्रथम भाषा, द्वितीय भाषा, गणित आणि विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रे असे विषय आहेत. पहिली ते बारावीची नियमित पाठय़पुस्तके आणि शिक्षणशास्त्र पदविका आणि पदवीच्या अभ्यासक्रमांवर आधारित प्रश्न विचारण्यात येतील.
अभ्यासक्रम
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- हा विषय प्राथमिक आणि उच्च प्राथमिक अशा दोन्ही स्तरांवरील परीक्षांसाठी आहे. या विषयामध्ये विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी राहणार आहेत. प्राथमिक स्तरासाठी सहा ते अकरा वर्षे वयोगटाच्या आणि उच्च प्राथमिक स्तरासाठी अकरा ते चौदा वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबधी प्रश्न असतील. याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्टय़े, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्टय़े या मुद्दय़ांवर आधारित प्रश्नांचाही सामावेश असेल.
भाषा-  भाषिक कौशल्ये, व्याकरण, भाषेतील साहित्याचे प्राथमिक ज्ञान यावर आधारित प्रश्न या विभागामध्ये असतील. प्रथम भाषा आणि द्वितीय भाषेच्या निवडलेल्या पर्यायानुसार ती भाषा शिकविण्याची तंत्रे, प्राधान्यक्रम, वयोगटानुसार भाषेचे अध्यापन या मुद्दय़ांचीही चाचणी या परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
परिसर अभ्यास- परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संकल्पना व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्दय़ांवर आधारित प्रश्न असतील. हा विषय फक्त प्राथमिक स्तरावरील परीक्षेसाठी आहे.
गणित व विज्ञान- प्राथमिक स्तरावरील गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, ताíककता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्दय़ांवर आधारित असतील. उच्च प्राथमिक स्तरासाठी गणित व विज्ञान या दोन्ही विषयांचा मिळून एक गट आहे. दोन्ही विषयांना समान प्राधान्य देण्यात येणार आहे. उच्च प्राथमिक स्तरासाठी गणित व विज्ञान विषय गटासाठी सामाजिक शास्त्रांच्या विषयाचा गट पर्याय म्हणून उपलब्ध आहे.
 सामाजिक शास्त्र – सामाजिक शास्त्राच्या गटामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र हे विषय आहेत. या सर्व विषयांमधील मूलभूत संकल्पना, आशय आणि अध्यापन तंत्र या मुद्दय़ांवरील प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
प्रा. सचिन परशुराम आहेर, सेवासदन अध्यापक विद्यालय

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
प्राथमिक स्तर
वेळ- २ तास ३० मिनिटे, एकूण गुण १५०
बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- ३० गुण
प्रथम भाषा- ३० गुण, द्वितीय भाषा- ३० गुण
गणित- ३० गुण, परिसर अभ्यास- ३० गुण

उच्च प्राथमिक स्तर
वेळ- २ तास ३० मिनिटे, एकूण गुण १५०
बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- ३० गुण
प्रथम भाषा- ३० गुण, द्वितीय भाषा- ३० गुण
गणित व विज्ञान-सामाजिक शास्त्रे- ६० गुण

‘टिस्स’साठी जानेवारीत प्रवेश परीक्षा
  मुंबई : मुंबई, तुळजापूर, गुवाहाटी आणि हैदराबाद येथील ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’च्या विविध अभ्यासक्रमांकरिता १० जानेवारी, २०१५ रोजी प्रवेश परीक्षा (टिस्स-नेट) घेण्यात येणार आहे. १० जानेवारीला दुपारी २ ते ३.४० या वेळेत ही परीक्षा होईल. एकूण ४९ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांकरिता ही परीक्षा होणार आहे. भारतातील ३९ शहरांमधील ८० केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.पदव्युत्तर पदवीच्या (एमए) कोणत्याही तीन अभ्यासक्रमांकरिता  अर्ज करता येईल. याकरिता २९ नोव्हेंबपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येईल. अर्ज केल्यानंतर १९ डिसेंबपर्यंत ई-मेलने उमेदवारांना परीक्षेची प्रवेशपत्रे पाठविली जातील. संस्थेच्या अभ्यासक्रमांची, पात्रता निकषांची माहिती http://www.tiss.edu, http://www.campus.tiss.edu या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यूजीसी-जेआरएफ पात्र उमेदवार, पदव्युत्तर, पदवीधर, सामाजिक क्षेत्राचा अनुभव असलेले तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आदी उमेदवार याकरिता अर्ज करू शकणार आहेत.