मुंबई विद्यापीठाच्या ‘दूर व मुक्त अध्ययन संस्थे’तर्फे (आयडॉल) शुक्रवारी घेण्यात आलेल्या राज्यशास्त्राच्या पदव्युत्तर पदवी (भाग १) परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नाकरिता नेमून दिलेले गुण चुकीचे छापले गेले होते. जो प्रश्न एरवी २५ गुणांकरिता विचारला जातो तो २० गुणांकरिता प्रश्नपत्रिकेत विचारून आल्याने विद्यार्थी गोंधळून गेले.
हा गोंधळ पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून दिल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना २० ऐवजी २५ गुणांप्रमाणे उत्तरे लिहा अशी सूचना परीक्षा सुरू असताना केली.  श्रेणी पद्धतीत ८० गुणांसाठी परीक्षा घेतली जाते. मात्र, ही पद्धती आयडॉलच्या विद्यार्थ्यांना लागू नाही. त्यामुळे, त्यांची परीक्षा १०० गुणांसाठीच होते. त्यानुसार त्यांनी प्रत्येकी २५ गुणांचे चार प्रश्न सोडवायचे होते. परंतु, २५ ऐवजी २० गुण छापून आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.