राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या १०२व्या पदवीप्रदान कार्यक्रमात वाटप करण्यात आलेल्या, तसेच न आलेल्या एकूण ७३ हजार ८७२ पदव्यांवर ‘व्ही’ ऐवजी ‘बी’ छापून आल्याने त्या सर्व पदव्या परत बोलावण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली आहे.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आचार्य पदवीधारक, सुवर्णपदके, रौप्यपदके आणि पारितोषिके प्राप्त विद्यार्थ्यांना त्याच वेळी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली, तर पदवी व पदव्युत्तर प्रमाणपत्रे प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्या सर्व प्रमाणपत्रांवर मुद्रित करण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी नावातील युनिव्हर्सिटी या शब्दात ‘व्ही’ चा ‘बी’ अशी घोडचूक झाली आहे. या प्रमाणपत्रांमुळे विद्यार्थ्यांवर नाहक बदनामीची परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व पदव्या परत बोलवून त्यावर विद्यापीठाच्या नावात ‘बी’ चा ‘व्ही’ केल्यानंतरच त्या प्रदान करण्यात येणार आहेत.