पूर्व माध्यमिक (चौथी) आणि  माध्यमिक (सातवी) शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी गुरूवारी जाहीर झाली असून राज्यात चौथीच्या १६ हजार ६८३ आणि सातवीच्या १६ हजार ४२८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यावर्षी पुणे आणि सोलापूर मधील विद्यार्थ्यांनी परीक्षेत बाजी मारली आहे. परिषदेच्या  http://www.mscepune.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी पाहता येईल.
यावर्षी चौथीच्या परीक्षेत शहर विभागात सोलापूर येथील दमाणी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी केदार पंडित ढेपे (३०० पैकी २९४ गुण) पहिला आला आहे. ग्रामीण विभागात कोल्हापूर जिल्ह्य़ातील जिल्हा परिषदेच्या दौलत मराठी विद्यामंदिर शाळेतील करण विजय पाटील (गुण २९६) पहिला आला आहे. चौथीच्याच सीबीएससी व आयसीएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या गटात ठाण्यातील दीर्घ समीर कुलकर्णी (गुण २८४) पहिला आला आहे. सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहर विभागात पुण्यातील अभिनव इंग्रजी विद्यालयाचा विद्यार्थी अनिष मिलिंद बापट आणि बीड जिल्ह्य़ातील नवीन प्रायमरी स्कूलचा सबाबर अहमद डबीर (गुण २९०) या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामीण विभागात सोलापूर जिल्ह्य़ातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा प्रज्ज्वल दादाराम जाधव (गुण २८४) पहिला आला आहे. सीबीएसई, आयसीएससी शाळांच्या गटात पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतील कणाद श्रीकर परदेशी (गुण २८४) पहिला
आला. राज्यातून ८ लाख ४५ हजार ३६५ विद्याथ्यार्ंनी चौथीची परीक्षा दिली होती, तर ६ लाख ४५ हजार ३२१ विद्यार्थ्यांनी सातवीची परीक्षा दिली होती.