पुणे विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये पॅरासाईट म्हणून राहणारे विद्यार्थी विद्यापीठाला काही नवीन नाहीत. एरवी वर्षभर विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये विद्यार्थी सर्रास अनधिकृतपणे रहात असतात. मात्र, त्या वेळी काहीच न करणाऱ्या विद्यापीठाने सुटय़ा लागल्यानंतर वसतिगृहातील अनधिकृत विद्यार्थी शोधण्याची हास्यास्पद मोहीम केली.
पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये मित्रांच्या खोल्यांमध्ये विद्यार्थी सर्रासपणे अनधिकृतपणे राहतात. वर्षभर त्याबाबत वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांकडून तक्रारीही केल्या जातात. मात्र, त्या वेळी विद्यापीठाकडून याप्रकरणी काहीच कार्यवाही केली जात नाही. या अनधिकृतपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे वसतिगृहाच्या व्यवस्थेवर आणि मिळणाऱ्या सुविधांवर ताण येतो. मात्र, तरीही या विद्यार्थ्यांना विद्यापीठ काही करत नाही. असा थंड कारभार असताना विद्यापीठाला अचानकपणे विद्यार्थी अनधिकृतपणे राहात असल्याचा साक्षात्कार झाला आणि विद्यापीठाने वसतिगृहांची झडती घेतली. मात्र, यातील गमतीचा मुद्दा म्हणजे ऐन सुटीच्या दिवसांमध्ये विद्यापीठाने वसतिगृहांची झडती घेतली, त्यामुळे त्यांना हात हलवतच परतावे लागले.