पुनर्मूल्यांकनाचे निकाल रखडवणे, एका विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेची सत्यप्रत दुसऱ्याला पाठवणे, फक्त पुरवण्या तपासून गुण देणे यासारखा गोंधळ व गैरव्यवस्थापनामुळे मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभाग यंदा चर्चेत राहिला. मात्र, या सगळ्यावर कडी करणारा एक धक्कादायक प्रकार एमएससीच्या एका विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडला आहे. या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिकाच विद्यापीठाने गहाळ केली आहे. त्याहून धक्कादायक प्रकार म्हणजे आपल्या उत्तरपत्रिकेच्या सत्यप्रतीसाठी अडून बसलेल्या या विद्यार्थ्यांने तोंड ‘बंद’ ठेवावे म्हणून त्याला उत्तीर्ण होण्याइतके गुण देऊन ‘मांडवली’ करण्याइतपत परीक्षा विभागाची मजल गेली आहे.
विवा महाविद्यालयात ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये एमएससी करणाऱ्या प्रमोद तिवारी या विद्यार्थ्यांने २०१३ मध्ये परीक्षा दिली होती. जानेवारी, २०१४ मध्ये एमएससीचा निकाल जाहीर झाला. त्यात प्रमोदला अ‍ॅनॅलिटिकल केमिस्ट्रीमध्ये अनुत्तीर्ण दर्शवण्यात आले. मात्र, या विषयात उत्तीर्ण होण्याची खात्री असलेल्या प्रमोदने उत्तरपत्रिकेची सत्यप्रत तसेच पुनर्मूल्यांकन यासाठी परीक्षा विभागाकडे अर्ज केला. महिनाभर त्याने सत्यप्रत आणि निकालाची वाट पाहिली. कलिनातील परीक्षा विभागात असंख्य चकरा मारल्या. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. अखेर मे महिन्यात विद्यापीठाकडून सत्यप्रत आल्याचे प्रमोदला त्याच्या महाविद्यालयाकडून कळवण्यात आले. मात्र, ही सत्यप्रत आपण लिहिलेल्या उत्तरपत्रिकेची नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने पुन्हा एकदा परीक्षा विभागाकडे चकरा मारायला सुरुवात केली. पण प्रत्येकवेळी त्याला टोलवण्यात आले. पुन्हा त्याला त्याच्या महाविद्यालयातून दूरध्वनी करून उत्तरपत्रिकेची सत्यप्रत आल्याचे सांगण्यात आले. मात्र, आलेल्या सत्यप्रती भलत्याच विद्यार्थ्यांच्या होत्या. प्रमोदने पुन्हा एकदा विद्यापीठाशी संपर्क साधला. त्यावर आमच्याकडे याच सत्यप्रती असल्याचे त्याला सांगण्यात आले. हा गोंधळ परीक्षा विभागातील वरिष्ठांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी प्रमोदला त्याच्या उत्तरपत्रिकेची सत्यप्रत लवकरच पाठवून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर पुन्हा महिनाभर विद्यापीठाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने प्रमोदने पुन्हा एकदा परीक्षा विभागात चकरा मारणे सुरू ठेवले. अखेर जूनमध्ये त्याच्यासमोर परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या हस्ताक्षराशी जुळणाऱ्या तीन ते चार उत्तरपत्रिका ठेवल्या. यातली तुझी ओळखून सांग, असे त्याला सांगण्यात आले. परंतु यापैकी एकही उत्तरपत्रिका प्रमोदची नव्हती. २० जूनला प्रमोद पुन्हा परीक्षा विभागात गेला तेव्हा तेथील एका अधिकाऱ्याने त्याच्यासमोर जवळपास सहा-सात उत्तरपत्रिका ठेवल्या, पण यातही त्याची उत्तरपत्रिका नव्हती. त्यावर त्या अधिकाऱ्याने प्रमोदला आपल्या वरिष्ठाकडे नेले. ‘या अधिकाऱ्याने मला घरी जाण्यास सांगितले. तसेच माझा पुनर्मूल्यांकनाचा निकाल सायंकाळपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करू, असे आश्वासन त्यांनी मला दिले. यात मला उत्तीर्ण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्या दिवशी सायंकाळी खरोखरीच संबंधित विषयात ६० पैकी उत्तीर्ण होण्याइतपत २४ गुण देऊन मला उत्तीर्ण घोषित करण्यात आले,’ असे प्रमोदने सांगितले. मात्र हा प्रकार न पटल्याने आणि माझ्या हक्काचे गुण हवे होते, या विचाराने प्रमोदने परीक्षा विभागाच्या खेपा सुरू ठेवल्या आहेत. आजही त्याला त्याची उत्तरपत्रिका मिळालेली नाही.
चौकशी करू
आम्हाला परीक्षा विभागात ३० लाख उत्तरपत्रिका सांभाळाव्या लागतात. त्यांचे व्यवस्थापन करणे ही सोपी गोष्ट नाही. उत्तरपत्रिकेवर मास्किंग व्यवस्थित न लावल्याने हा प्रकार झाला असावा. परिणामी, विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक फाडला गेला असेल आणि त्याला नवा बारकोड क्रमांक देण्यात आला असेल. समजा, कुणी बारकोड नीट लावला नसेल तर उत्तरपत्रिका गहाळ होऊ शकते. आम्ही या व्यवस्थेत आणखी सुधारणा करण्याचा विचार करतो आहोत. तसेच प्रमोद तिवारी याच्या प्रकरणाचीही आपण चौकशी करून त्याच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ.
दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक, मुंबई विद्यापीठ