सेवेत असताना मृत्यू झालेल्या राज्यातील शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ६८५ कुटुंबीयांना अखेर चार कोटी रुपयांचा आर्थिक निधी मंजूर करून राज्य सरकारने दिलासा दिला आहे.
ही रक्कम तातडीने शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत वितरित करण्यात येणार आहे. सेवेत असताना मृत्यू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र, गेली पाच वर्षे निधीअभावी ही मदत मिळत नव्हती. शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व आमदार रामनाथ मोते यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना भेटून गेली अनेक वर्षे थकीत असलेली ही रक्कम कुटुंबीयांना वितरित करण्याची मागणी केली होती.
अनुदानित संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने ६० हजार रुपये विशेष आर्थिक साहाय्य म्हणून दिले जातात; परंतु निधीची तरतूद नसल्याने रायगड जिल्हय़ातील २५, जळगावमधील ५०, रत्नागिरीतील ८, ठाण्यातील ७ अशी तब्बल ६८५ कुटुंबे या मदतीपासून वंचित होती. त्यांना अखेर ही मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने दिलासा मिळाला आहे.