आयआयटीच्या पवई संकुलात २ ते ४ जानेवारी रोजी रंगणाऱ्या वार्षिक तंत्रमहोत्सवात यंदा चांगलीच रोबोमस्ती पाहवयास मिळणार आहे. यामध्ये चित्र काढणाऱ्या रोबो पासून ते फूटबॉल खेळणाऱ्या रोबोपर्यंत विविध कलाकुसर करणाऱ्या रोबोंपर्यंत सर्वाचा समावेश आहे.
तंत्रमहोत्सवात यंदा प्रथमच ‘बीच बोट’चा समावेश करण्यात आला आहे. हा रोबो वाळूवर विविध प्रकारची चित्र काढू शकतो. झुरीच येथील स्वीस फेडरल तंत्रज्ञान संस्थेने हा रोबो विकसित केला आहे. तर याचबरोरबर पाण्याखालील काम करणाऱ्या रोबोच्या धर्तीवर कटलफिश रोबो तयार करण्यात आला आहे. हा रोबो सागरी जीवांचा अभ्यास करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. हा रोबो माशाच्या आकाराचा असून तो सागरी जीवांच्याजवळ जाऊन त्यांचा अभ्यास करू शकणारा आहे. तर फूटबॉलचा रोबो कप विजेती ‘टिगर्स मशीन’ हा रोबोंचा फूटबॉल संघही तंत्रमहोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे. फ्रान्सच्या भारतीय दूतावासातील विज्ञान विभागाने तयार केलेला जैविक हात ही तंत्रमहोत्सवातील प्रदर्शनामध्ये पाहवयास मिळणार आहे. याशिवाय प्रदर्शनात विविध प्रकारच्या तंत्राविष्कार पाहवयास मिळणार आहे. प्रदर्शनामध्ये सीना सीम या या शस्त्रक्रिया यंत्राची प्रतिकृतीही पाहवयास मिळणार आहे. याशिवाय जगातील सर्वात छोटी इेलेक्ट्रिक बाइक, थ्रीडी बुद्धीबळ पट, मेंदूच्या रिअल टाइल हालचाली टिपणे, चेहरा ओळखणे आदी गंमतीशीर गोष्टींचाही यामध्ये समावेश असणार आहे.