पूर्व माध्यमिक म्हणजेच चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळविणे, संबंधितांचे आक्षेप लक्षात घेऊन सुधारणा सुचविणे आदी कारणांमुळे यंदा चौथीबरोबरच सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑक्टोबपर्यंत लांबवावी लागणार आहे.
चौथीचा अभ्यासक्रम यंदा बदलला आहे. त्यानुसार २०१४-१५च्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरूपातही बदल झाले आहेत. या नव्या अभ्यासक्रमाबाबत आक्षेप वा सूचना नोंदविण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती.
नव्या अभ्यासक्रमातून काही घटक वगळले आहेत तर काही नवीन अंतर्भूत केले आहेत. या बाबत काही शिक्षक आक्षेप नोंदवतील असा अंदाज होता. मात्र, एकही सूचना न आल्याने शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजक असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’ने आक्षेप नोंदविण्याची मुदत १५ सप्टेंबपर्यंत वाढविली आहे.
या शिवाय या बदलाला राज्य सरकारकडूनही नुकतीच मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे, १५ सप्टेंबपर्यंत कुणाचेही आक्षेप न आल्यास संबंधित बदलांची माहिती देणारी अधिसूचना काढावी लागणार आहे. त्यानंतर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होईल. तोपर्यंत ऑक्टोबर उजाडणार असून विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीत परीक्षेचे अर्ज भरावे लागण्याची शक्यता आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेकरिता अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया दरवर्षी ऑगस्टपर्यंत पूर्ण होते. परंतु, यंदा परीक्षेचे अर्ज ऑनलाइन भरून घेण्यात येणार असल्याने या प्रक्रियेला विलंब झाला आहे. त्याचबरोबर चौथीचा सुधारित आराखडा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे, त्याला सरकारकडून मान्यता घेणे यालाही बराच विलंब झाल्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑक्टोबपर्यंत लांबणार आहे. अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकांचा सुधारित आराखडा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यावर काही आक्षेप असल्यास शिक्षकांनी ते टपालाद्वारे किंवाmscepune@gmail.com या ई-मेलद्वारे पाठवावे, असे परिषदेचे आयुक्त व्ही. बी. पायमल यांनी कळविले आहे.
अभ्यासक्रमातील प्रस्तावित बदल
चौथीला आतापर्यंत भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे (इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र) या विषयांकरिता स्वतंत्रपणे अभ्यासक्रम होता. शिष्यवृत्ती परीक्षेच्या (पेपर-२) गणित विषयाच्या अभ्यासक्रमात ७० गुण गणिताला आणि ३० गुण इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र (सामाजिक शास्त्र) अशी गुणांची विभागणी होती. तर बुद्धिमत्ता चाचणी (पेपर-३) यात ७० गुण बुद्धिमत्ता चाचणीकरिता तर ३० गुण विज्ञानाकरिता अशी गुणांची विभागणी होती. नव्या अभ्यासक्रमात पेपर क्रमांक-२ साठी (गणित व परिसर अभ्यास-१) व पेपर क्रमांक-३साठी (बुद्धीमत्ता चाचणी व परिसर अभ्यास-२) असा बदल करण्यात आला आहे.