विज्ञानातील गुंतागुंतीच्या गोष्टी सोप्या पद्धतीने व शब्दांमध्ये सामान्य व्यक्तीसमोर उलगडण्याच्या उद्देशाने मुंबईत ४ आणि ५ जानेवारीला ‘सायन्स कम्युनिकेटर्स मीट’ (विज्ञान संवादक परिषद)होणार आहे. ३ ते ७ जानेवारी दरम्यान भरणाऱ्या ‘भारतीय विज्ञान परिषदे’शी समांतर असे या बैठकीचे आयोजन केले जाते. यंदाचे या बैठकीचे आठवे वर्ष आहे.
मुंबई विद्यापीठात भरणाऱ्या या बैठकीचे उद्घाटन ज्येष्ठ संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयातील ‘मार्शल हॉल’मध्ये हा कार्यक्रम होणार आहे. तर या बैठकीचा समारोप उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते डॉ. रॅन्डी शेक्समन यांचे व्याख्यान होणार आहे.  
सोप्या भाषेत विज्ञान
शेती, पशुवैद्यक, आरोग्य, लघु उद्योग, कचरा व्यवस्थापन, इंधन, गृह, वीज, वाहतूक, अवकाश संशोधन, संप्रेषण, शिक्षण आणि जागतिक शांतता या क्षेत्रांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रचंड महत्त्व आहे. या क्षेत्रातील विज्ञानाची भूमिका सोप्या शब्दांत समजावून देणे हे या बैठकीचे उद्दिष्ट आहे, असे या बैठकीच्या समन्वयक अनुराधा घोष यांनी सांगितले.