सर्वागीण प्रयत्न करूनही सर्वसाधारण विद्यापीठांच्या तुलनेत अल्पसंख्याक असलेल्या विद्यापीठांसाठी स्वतंत्र ‘चॅन्सलर्स ट्रॉफी’ यापुढे दिली जाणार आहे. या चान्सलर्स ट्रॉफीसाठी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ या विद्यापीठांनाच गृहीत धरले जाणार आहे. विद्यार्थिसंख्येच्या बाबतीत अल्पसंख्याक असलेल्या विद्यापीठांसाठी ही स्वतंत्र ‘चान्सलर्स ट्रॉफी’ प्रदान करण्याचा प्रस्ताव या वर्षीपासून अमलात आणण्यात येईल.
अलीकडच्या काळात ऑलिम्पिक असो की राष्ट्रकुल स्पर्धा असोत, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक क्रीडा प्रकारांमध्ये भारताच्या चमकदार कामगिरीचे प्रतिबिंब विद्यापीठ पातळीवरही उमटलेले दिसून येते. राज्य शासन विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकासाबरोबरच त्यांच्या क्रीडा कौशल्याकडे पुरेसे लक्ष पुरवू लागले आहे. क्रीडा कौशल्यवाढीसाठी ‘क्रीडा महोत्सव’, सांस्कृतिक कौशल्य वाढवण्यासाठी ‘इंद्रधनुष’, संशोधनात्मक वृत्ती रुजवण्यासाठी ‘आविष्कार’ आणि एनएसएससाठी ‘आव्हान’ असे चार महत्त्वाचे उपक्रम आंतर-विद्यापीठ स्तरावर आयोजित करण्यात येतात. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचा या उपक्रमातील सहभाग त्याला नोकरीसाठी किंवा पुढील शिक्षणासाठी उपयोगी ठरतोच. कलाकौशल्य सादर करण्याच्या विद्यार्थ्यांमधील उपजत वृत्तीला या उपक्रमातून एक सकारात्मक दिशा प्रदान करण्याचा एक चांगला हेतू फलद्रूप होतो.
क्रीडा महोत्सव, इंद्रधनुष, आविष्कार आणि आव्हान या चारही उपक्रमांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यापीठांना ‘चॅन्सलर्स कप एक’ आणि ‘चॅन्सलर्स कप दोन’ सन्मानपूर्वक कुलगुरूंच्या बैठकींमध्ये पात्र ठरलेल्या विद्यापीठाच्या कुलगुरूंना कुलपतींच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. मात्र ‘चॅन्सलर्स ट्रॉफी’ उपरोक्त उल्लेख केलेल्या चार प्रवर्गातील विद्यापीठांपैकी एका विद्यापीठाला दिले जाणार आहे. त्यासाठी सर्वसाधारण विद्यापीठांसाठी लागू केलेले निकष लक्षात घेतले जाणार आहेत. त्यासाठी स्पर्धा केवळ महिला विद्यापीठ, कृषी, विज्ञान आणि मत्स्य विद्यापीठांदरम्यान राहणार आहे. या संदर्भात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या क्रीडा संचालक डॉ. लिंडा डेनिस म्हणाल्या, एसएनडीटी विद्यापीठाला आजच्या घडीला सुमारे २०० महाविद्यालये संलग्नित आहेत. खास महिला शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेले आमचे विद्यापीठ केवळ महिला गटातील क्रीडा प्रकारांमध्येच भाग घेऊ शकते. इतर साधारण विद्यापीठांचे पुरुष आणि महिलांच्या विविध क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र संघ किंवा व्यक्तिगत सहभाग खेळांमध्ये असतो. त्यामुळे सर्वसाधारण चषक देताना त्यांचे गुण वाढतात. क्रीडा महोत्सवात आमची सर्वसाधारण कामगिरी सरस ठरूच शकत नाही, कारण आमचे संख्याबळ कमी आहे. तोच प्रकार कृषी विद्यापीठ, आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि मत्स्य विद्यापीठांच्या बाबतीतही आहे. यावर शासनाने सर्वतोपरी विचार करून केवळ या चार प्रवर्गातील विद्यापीठांचे क्रीडा महोत्सव, इंद्रधनुष, आविष्कार आणि आव्हान या उपक्रमांतील सरासरी कामगिरी लक्षात घेऊन ‘चान्सलर्स ट्राफी’ प्रदान करण्यात येणार आहे.