मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलाच्या जमिनीवरील ‘ऑल इंडिया टेनिस असोसिएशन’च्या (आयटा) भल्यामोठय़ा प्रशिक्षण केंद्राचा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना उपयोग काय, असा सवाल करत ‘युवा सेने’ने त्याला टाळे ठोकले.
आयटाशी कधीकाळी सामंजस्य करार करून विद्यापीठाने ही जागा त्यांना प्रशिक्षण केंद्रासाठी दिली होती. तेथे महिना तीन हजार ते वर्षांला १ लाख ४४ हजार रुपये आकारून प्रवेश दिला जातो. या केंद्राबाहेर उभ्या असलेल्या आलिशान गाडय़ा पाहिल्या तरी या केंद्राचा उपयोग नक्की कुणाला आहे, याचा अंदाज यावा. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना या शुल्कात कोणतीही सवलत नाही. मग, हे केंद्र विद्यापीठाच्या जागेत कशाला हवे,’ असा युवा सेनेचा सवाल आहे. हे केंद्र येथून हलवून विद्यापीठाने आपली जागा परत घ्यावी, अशी मागणी युवा सेनेने विद्यापीठाकडे केली होती. तेथे वसतीगृह किंवा इतर सुविधा उपलब्ध करून देता येतील. पण, या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याने युवा सेनेने शुक्रवारी आंदोलनाचा पावित्रा घेतला.
दुपारी तीनच्या सुमारास युवा सेनेच्या ५०-६० कार्यकर्त्यांनी केंद्राचे कार्यालय गाठले. तेथील कर्मचाऱ्यांना तेथून हुसकावून लावण्यात आले आणि कार्यकर्त्यांनी थेट या केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारालाच टाळे ठोकले. या आंदोलनामुळे येथील वातावरण चांगलेच तापले. पोलिसांचा ताफाही घटनास्थळी पोहोचला. परंतु, काही झाले तरी आम्ही केवळ या आंदोलनावर थांबणार नाही. अधिसभेत आणि व्यवस्थापन सभेतही हा मुद्दा लावून धरण्यात येणार आहे, असे युवा सेनेने स्पष्ट केले आहे.
संचालकांना पावसात उभे राहण्याची शिक्षा
विद्यापीठाच्या ‘दूर व मुक्त अध्ययन संस्थे’मधील (आयडॉल) दूरवस्थेमुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाला वाचा फोडण्याकरिता युवा सेनेने आयटानंतर आपला मोर्चा या संस्थेच्या इमारतीकडे वळवला. आयडॉलमध्ये दररोज हजारो विद्यार्थी येत असतात. पण, या विद्यार्थ्यांकरिता चौकशी किंवा अर्ज भरून देण्यासाठी असलेल्या खिडक्यांवर साधी शेडही बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे, भर पावसात भिजत उभे राहत विद्यार्थ्यांना रांगा लावाव्या लागतात. त्यावर युवा सेनेने आयडॉलचे संचालक हरिचंदन यांनाच थोडा वेळ पावसात उभे केले. स्वत: भिजल्यानंतर तरी विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाची दखल संचालक घेतील आणि आवश्यक तेथे शेड बांधून देतील, अशी अपेक्षा युवा सेनेच्या एका कार्यकर्त्यांने व्यक्त केली.