योग शिक्षणाच्या प्रसारासाठी ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग’ (एनसीईआरटी) शाळांसाठी योग प्रकार तयार केले असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून या शिक्षणाची अंमलबजावणी शाळांमधून होण्याची शक्यता आहे.
लोणावळ्याच्या कैवल्यधाम संस्थेचे सहकार्य हे प्रकार तयार करण्यासाठी लागले आहे. योगासनांच्या फायद्यांची माहिती तरूणांना व्हावी यासाठी कैवल्याधामतर्फे लोणावळा येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एनसीईआरटीचे समन्वयक प्रकाश राव यांनी ही माहिती दिली. योगासनांमुळे माणसातील आध्यात्मिक प्रकृतीला चेतना मिळते. यामुळे एखाद्या व्यक्तीचे सामाजिकरण लवकर होते. मुलांमधील अनेक सुप्त गुणांना चालना देण्यासाठीही योगासनांचा उपयोग होतो. शारीरिक फायद्यांबरोबरच मुले जागरुक होतात. लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यांना योगासनांचा उपयोग होतो, असे या परिषदेत बोलताना राव यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. हेमंत गोखले, निवृत्त न्या. बी. एन. कृष्ण, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख, कुलगुरू राजन वेळुकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारतासह अमेरिका, फ्रान्स, इटली, ब्राझील, चीन, कॅनडा, ग्रीस, कोरिया, पोर्तुगल आदी देशातील प्रतिनिधींनी परिषदेला हजेरी लावली.