आपल्या आसपासच्या परिसरात हवेतील धूलिकण, ध्वनी प्रदूषण याचे प्रमाण किती आहे याचा अचूक अंदाज लावणे आपल्याला कठीण असते. प्रदूषणाचा अचूक अंदाज यावा यासाठी के. जे. सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘इको मॅपर्स’ नावाचे एक उपकरण तयार केले आहे. या उपकरणाला नुकत्याच पार पडलेल्या ‘इनोव्हेशन जॉकी’ या राष्ट्रीय पातळीवरील स्पध्रेत परीक्षकांच्या पसंतीचे विशेष बक्षीसही मिळाले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर प्राधिकारणांची परवानगी मिळाल्यावर हे उपकरण बाजारात आणण्याचा विद्यार्थ्यांचा मानस आहे.
अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेत असलेल्या गौरव गांधी, जय विसारिया, धिरज गेहलोत आणि अमित यादव या विद्यार्थ्यांनी हे उपकरण विकसित केले आहे. त्यांनी विकसित केलेले हे उपकरण ‘अ‍ॅक्सेंच्युअर इनोव्हेशन जॉकी कॉन्टेस्ट’मध्ये सादर केले होते. या स्पध्रेसाठी देशभरातून १३०० प्रकल्प सादर करण्यात आले; यातील १३ प्रकल्पांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली होती. त्यात या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला ‘परीक्षकांची पसंती’ म्हणून गौरविण्यात आले. उपकरण तयार करण्यासाठी वापण्यात आलेले सेन्सर्स विविध पातळय़ांवर तपासून घेतले आहेत.
हे उपकरण ‘जीआयएस’ आणि ‘जीपीएस’द्वारे जोडले जाणार असून यात नोंद होणारी माहिती विद्यार्थ्यांच्या http://ecomappers.com/ या संकेतस्थळावर अद्ययावत होत राहणार आहे.  याशिवाय विविध ठिकाणच्या प्रदूषणांच्या प्रकारांचा अभ्यास करून ते रोखण्यासाठी काय उपाययोजना करायच्या, कोणती झाडे लावावीत आदी माहितीही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे या विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.