‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंग’ची परीक्षा देणाऱ्या विशेष मुलांना पहिल्याप्रमाणे लेखनिक (रायटर) मिळावा या मागणीसाठी आता पालकांचे प्रतिनिधी ‘महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगा’कडे (एनआयाओएस) दाद मागणार आहे.
आत्ममग्नता व अनेक कारणांमुळे अध्ययन दोष असलेल्या विशेष मुलांना परीक्षेकरिता लेखनिक देण्याची तरतूद आहे. परंतु, या वर्षी परीक्षेकरिता वेळ वाढवून दिल्याचे कारण देत एनआयओएसने लेखनिकची सुविधा बंद करून टाकण्याचा निर्णय घेतला. या मुलांच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा १० एप्रिलापासून सुरू होत आहेत. परंतु, परीक्षेच्या तोंडावरच लेखनिकाबाबतचा निर्णय रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे.
विशेष मुलांना उत्तरपत्रिका लिहिण्याकरिता वेळ वाढवून दिला तरी नजर आणि बोटे यांच्यात समन्वय साधणेच कठीण असल्याने लेखनिकाशिवाय या मुलांना पेपर लिहिताच येणार नाही, असे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे, आधीच्या नियमांनुसार त्यांना लेखनिक देण्यात यावा, अशी मागणी पालकांनी एनआयओएसकडे केली आहे.
या संदर्भात पालकांनी पुण्याच्या मंडळाच्या प्रादेशिक केंद्राबरोबरच दिल्लीतील मंडळाचे मुख्यालयाकडेही पत्र लिहून या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेण्याची विनंती केली आहे. काही पालक या संदर्भात मंगळवारी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. मंडळाने यात तातडीने हस्तक्षेप करून या मुलांना लेखनिकाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आम्ही करणार आहोत, असे सर्व पालकांतर्फे डॉ. पर्सी भरूचा यांनी सांगितले.