राज्यातील समाजकल्याण विभागाकडे असलेली समाजकार्य महाविद्यालये महिनाभरात उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना केली.
विक्रम काळे, हेमंत टकले, अ‍ॅड. जयदेव गायकवाड या सदस्यांनी समाजकार्य महाविद्यालये वर्ग करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. समाजकल्याण विभागाच्या अधिपत्याखालील महाविद्यालयांना शिक्षण विभागाकडे असणाऱ्या महाविद्यालयांप्रमाणे फायदे मिळत नाहीत, ही अडचण लक्षात घेऊन समाजकल्याण विभागाच्या नियंत्रणाखालील समाजकार्य महाविद्यालये शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा मुद्दा १९९० मध्ये उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळच्या समाजकल्याण संचालनालयाने शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांप्रमाणेच समाजकार्य महाविद्यालयांनाही फायदे देता येतील, असे सांगितले.