महाविद्यालयात  तास नसल्यामुळे मैदानात जाऊन क्रिकेट खेळणाऱ्या ठाणे आयटीआय मधील विद्यार्थ्यांना प्राचार्यानी बेदम मारहाण केल्याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल केली आहे. वैद्यकीय तपासणीसाठी या विद्यार्थ्यांना ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आयटीआयचे प्राचार्य पी.बी.भावसार यांच्याविरोधात विद्यार्थ्यांची तक्रार आहे. रात्री ऊशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. अशाप्रकारची तक्रार प्राप्त झाली असून तपास सुरु आहे, अशी माहिती श्रीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस सुत्रांनी दिली.
महाविद्यालयात लेक्चर तसेच वर्कशॉप नसल्यामुळे काही विद्यार्थी लगतच असलेल्या मैदानात जाऊन क्रिकेट खेळू लागले. पुढच्या लेक्चरची वेळ झाल्याने हे विद्यार्थी महाविद्यालयातील वर्कशॉपमध्ये परतले. महाविद्यालयाच्या वेळेत क्रिकेट खेळताना या विद्यार्थ्यांना पाहून संतापलेले प्राचार्य भावसार वर्कशॉपमध्ये आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना जाब विचारला. यावेळी संतापलेल्या प्राचार्यानी बांबू आणि बेन्चच्या लाकडी फळ्यांनी आम्हाला मारहाण केली, अशी तक्रार जखमी विद्यार्थी विराज माडवकर यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. विराजसह संदीप शिर्के, प्रवीण कांबळे, सूरज मोकाशी, भूषण बांगर हे विद्यार्थी जखमी झाले असून या सर्वाना वैद्यकिय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.