स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला ‘नॅक’ समितीने ‘अ’ श्रेणी प्रदान केली आहे. स्थापनेनंतर कमी अवधीत हा दर्जा मिळवणारे राज्यातील हे पहिलेच विद्यापीठ असून, राज्यातील मोजक्या ५ विद्यापीठांच्या पंगतीत आता स्वारातीम विराजमान झाले आहे. या पाश्र्वभूमीवर कुलगुरूंनी विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांसह जल्लोष साजरा केला. एकमेकांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.
जानेवारीमधील २७ ते ३०, असे ३ दिवस नॅक समितीने विद्यापीठात सखोल तपासणी केली. त्यानंतर बुधवारी समितीचा ‘अ’ श्रेणी प्रदान केल्याचा निरोप आला आणि विद्यापीठात आनंदाला उधाण आले. वस्तुस्थिती, प्रामाणिकपणा व निखळ गुणवत्ता, या तीन कसोटय़ांवर हा सन्मान प्राप्त झाला. विद्यापीठाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, यामुळे विद्यापीठाशी संबंधित सर्वच घटकांची मानसिकता अधिक सकारात्मक होईल, असे मानले जाते. कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली, तेव्हाच आपल्या मनोगतात विद्यापीठाला ‘अ’ दर्जा मिळवून देण्यास आपला प्रयत्न असेल, असे सांगितले होते.
डॉ. विद्यासागर यांनी बुधवारी पत्रकार बैठक घेऊन विद्यापीठाच्या आनंदयात्रेची पाश्र्वभूमी विशद केली. इतर विद्यापीठांच्या तुलनेत या विद्यापीठाला प्रगतीच्या भरपूर संधी आहेत.
येथे विद्यापीठात भूकंपमापक यंत्र आहेच, परंतु कार्यक्षेत्रात किल्लारी (जिल्हा लातूर) व किनवट (जिल्हा नांदेड) येथेही ते कार्यरत आहे. विद्यापीठाने सुरुवातीपासूनच कॉपीमुक्तीवर भर दिल्यामुळे गुणवत्ता जपली गेली. विद्यापीठात टेलिस्कोप यंत्रणा असून ‘नॅक’ समिती या तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेने प्रभावित झाली. ‘एक शिक्षक, एक कौशल्य’ योजनेमुळे सर्वच प्राध्यापकांमध्ये संशोधनवृत्ती वाढली, त्याचाही चांगला फायदा झाला. विद्यापीठ परिसरात सद्यस्थितीत १२० प्रकल्प सुरू असून, त्यासाठी १२ कोटी रुपये खर्च होत आहेत.