‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या राज्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने पुस्तक छपाईसाठी लागणाऱ्या कागदाचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने काही ठोस पाऊले उचलली आहेत. पुढील शैक्षणिक वर्षांपासून व्यवस्थापन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहे. तर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांची पुस्तकेही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून ती सर्वासाठी खुली राहणार आहेत.
समाजातील विविध घटकांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने मुक्त विद्यापीठ राज्यात काम करत आहेत. या विद्यापीठाच्या माध्यमातून घरकाम करणाऱ्या महिला, डबेवाले, रिक्षाचालक यांनाही शैक्षणिक पात्रता मिळविता आली आहे. या विद्यापीठाच्या या कामाचा विस्तार अधिक करण्याच्या उद्देशाने नवनियुक्त कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी खासगी संस्थांना संयुक्तरीत्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. अनेक कंपन्या किंवा खासगी शैक्षणिक संस्था चांगल्या दर्जाचे शिक्षण देत असतात. पण त्यांच्या शिक्षणाला मान्यतेची गरज असते. अशा संस्थांनी पात्रता निकष पूर्ण केले तर त्यांच्याशी सहकार्य करून अभ्यासक्रम तयार करण्याचा मानस असल्याचे डॉ. साळुंखे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळय़ाच्या कार्यक्रमानिमित्त ते मुंबईत आले होते त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
मुक्त विद्यापीठाला पुस्तक छपाईसाठी दरवर्षांला तब्बल २० कोटी रुपयांचा कागदाचा खर्च येत असतो. हा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने पुस्तकाची डिजिटायजेशन प्रक्रिया सुरू केली आहे. काही अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना अवघ्या पाच हजार रुपयांत पाठय़क्रम अपलोड केलेला टॅब दिला जाणार आहे. विद्यापीठ सध्या विविध क्षेत्रांतील कंपन्यांशी चर्चा करत असून त्यांच्या सहकार्याने लवकरच वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचेही डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाची सर्व पाठय़पुस्तके संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार असून ही पाठय़पुस्तके केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर कुणालाही वाचता येऊ शकतील. यामुळे खऱ्या अर्थाने ज्ञानार्जनाचे काम होईल, असा विश्वास डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केला. विद्यापीठाची पुण्यात जागा असून त्या जागेवर खासगी कंपनीच्या सहयोगातून लवकरच कौशल्याधारित अभ्यासक्रम शिकविण्यासाठी विशेष इमारत उभी करण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले.