राज्यातील ४५ हजार अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून शिक्षक भारती या शिक्षकांच्या संघटनेने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. याच प्रश्नावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी बांधीलकी सांगणाऱ्या शिक्षक परिषद या संघटनेनेही शनिवापर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा ‘भारतीय जनता पक्ष’प्रणीत राज्य सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे, अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न येत्या काळात पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नाबरोबरच प्रोबेशनवरील शिक्षकांना सेवामुक्त करणारा निर्णय रद्द करावा, याकरिता शिक्षक भारतीने आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली चर्नी रोड येथील उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली. ‘अच्छे दिन है कहा,’ असा सवाल करत शेकडो शिक्षकांनी उपसंचालक कार्यालय दणाणून सोडले. भाजपचे सरकार सत्तेवर येऊनही अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे याबद्दल आंदोलनकर्त्यां शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, मुंबईचे अध्यक्ष अंकुश महाडिक, कार्यवाह राजू बंडगर, राज्य उपाध्यक्ष शशिकांत उतेकर, जियाउद्दीन काझी, महिला आघाडीच्या नेत्या कल्पना शेंडे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. दोन दिवसांत सरकारने या प्रश्नांवर निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र निदर्शने करू, अशा इशारा बेलसरे यांनी या वेळी दिला. याच प्रश्नावरून संघाची विचारसरणीशी बांधीलकी असलेल्या शिक्षक परिषदेचे आमदार रामनाथ मोते यांनीही शनिवापर्यंत निर्णय न झाल्यास सोमवारपासून रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.