निवडणुकीच्या कामांसाठी अनुदानित शैक्षणिक संस्थेतून ३० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी घेऊ नयेत, असे निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश असतानाही काही ठिकाणी १०० टक्के कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे देण्यात आली आहेत. याविरोधात मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
निवडणुकीच्या कामासाठी शाळेतील सर्वच कर्मचाऱ्यांची निवड केल्यामुळे शाळेतील अनेक कामे रखडून पडली आहेत. याचबरोबर सध्या दहावी आणि बारावीच्या ऑक्टोबरच्या परीक्षा सुरू असल्यामुळे शिक्षकांना तीही कामे करावी लागत आहेत. यामुळे शाळांमधील कामांचे व्यवस्थापन करणे अवघड होत आहे. यामुळे काही ठिकाणी निवडणुकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना पुन्हा शाळेत येण्याचे आदेश काढावे लागत आहेत. या आदेशांमुळे शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण असल्याचे, संघाचे सरचिटणीस प्रा. अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या १७ जुलैच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यासाठी बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले असून या संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी, शालेय शिक्षण विभागाच्या सचिव यांना निवेदन देण्यात आल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
बदली रजा देण्याची मागणी
निवडणुकीच्या काळात शिक्षकांना १८ ते २४ तास काम करावे लागते. हे काम करणाऱ्यांना दोन दिवसांची बदली किंवा विश्रांती रजा देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक भारतीने मुख्य सचिवांकडे केली आहे. निवडणुकीसाठी शिक्षकांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष मतदानाचा दिवस यासाठी एकूण चार दिवस द्यावे लागतात. यामुळे सुट्टी देण्याची मागणी केल्याचे शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी स्पष्ट केले.