परीक्षेच्या आधीच शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना प्रश्नांची यादी त्यांच्या उत्तरांसह पुरविण्याचे धक्कादायक गैरप्रकार मालाडच्या ‘टी. एस. बाफना कला आणि वाणिज्य महाविद्यालया’त सुरू असून येथे शिकणाऱ्या हजारो विद्यार्थिनींच्या भवितव्याचा अक्षरश: खेळखंडोबा केला जातो आहे. आश्चर्य म्हणजे बारावीच्या विद्यार्थ्यांकडून १७ क्रमांकाचा अर्ज भरून घेण्याच्या नावाखाली मनमानी शुल्क उकळणे, अकरावी-बारावीचे वर्ग बेकायदेशीररीत्या सायंकाळच्या सुमारास चालविणे असे अनेक गैरप्रकार या महाविद्यालयात सुरू आहेत. परंतु, त्या विषयी वारंवार तक्रारी केल्यानंतरही आणि वृत्तपत्रात जाहीर वाभाडे काढूनही शिक्षण विभागाने या महाविद्यालयाची साधी चौकशीही केलेली नाही. आता तर थेट परीक्षांमध्येच शिक्षकांच्या मदतीने गैरप्रकार करण्यापर्यंत या महाविद्यालयाची मजल गेली आहे.मुंबईतील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्लासेसबरोबरचे टायअप कोर्सेस, प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये घातले जाणारे घोळ, १७ क्रमांच्या अर्जाच्या नावाखाली अतिरिक्त शुल्कवसुली असे गैरप्रकार सर्रास सुरू आहेत. परंतु, अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने तसेच प्रसंगी त्यांचाच वरदहस्त असल्याने या महाविद्यालयांचे फावले आहे. आता तर परीक्षा व्यवस्थेलाच नख लावण्यापर्यंत ही महाविद्यालये धजावू लागली आहेत. बाफना या मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षांदरम्यान होणारे गैरप्रकार तर याचे नमुनेदार उदाहरण म्हणायला हवे. येथील अकरावीच्या विद्यार्थिनींची पहिली चाचणी परीक्षा गेल्या आठवडय़ात संपली. एका दिवशी दोन या प्रमाणे तीन दिवसांत उरकरण्यात आलेली ही परीक्षा म्हणजे धूळफेकीचाच प्रकार म्हणायला हवा. कारण, या महाविद्यालयात शिक्षकांकरवी परीक्षेच्या आधीच विद्यार्थिनींना प्रश्नांची यादी त्यांच्या उत्तरांसह पुरविली गेली होती. इथले काही शिक्षक तर इतके महाभाग आहेत की त्यांनी एका खासगी गाईड किंवा अपेक्षित प्रश्नसंच सदृश पुस्तकांच्या पानांच्या फोटोकॉपी करून (की ज्यांच्या पानाखाली उत्तरेही दिली होती) त्या विद्यार्थिनींना वाटल्या. त्यानंतर त्यातलेच प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले. या परीक्षांचे गुण अंतिम गुणपत्रिकेत धरले जात असल्यामुळे या गुणांना विशेष महत्त्व आहे.या महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीच्या जागरूक पालकाने हा प्रकार संबंधित प्रतिनिधीच्या लक्षात आणून दिला. २८ ऑगस्टला या ठिकाणी ‘ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट’ आणि ‘इकॉनॉमिक्स’ या विषयांची प्रत्येकी २५ गुणांसाठीची परीक्षा ५.१५ ते ७.१५ या वेळेत आयोजिण्यात आली होती. परंतु, या दोन्ही विषयांच्या ३५ संभाव्य प्रश्नांची यादी त्यांच्या उत्तरांसह या पालकाने संबंधित प्रतिनिधीला दुपारी दोनच्या सुमारास व्हॉट्सअपवर पाठविली होती. या यादीशी सायंकाळी झालेल्या परीक्षेतील प्रश्न पडताळून पाहिले असता सर्व २५ प्रश्न (प्रत्येकी १ गुण) हे या यादीतील होते. केवळ त्यांचा क्रम वेगळा होता.या प्रश्नपत्रिकाही ‘महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ने चाचणी परीक्षेचा ठरवून दिलेला नमुनाही धुडकावूनही तयार केल्या गेल्या होत्या. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी असावे असा मंडळाचा नियम आहे. त्यांची उत्तरे देतानाही विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा कस लागला पाहिजे. परंतु, सर्व ठिकाणी केवळ दिलेल्या पर्यायांमधून गाळलेल्या जागा भरा प्रकारचेच प्रश्न होते. त्यामुळे, अवघ्या १० मिनिटांत पेपर सोडवून विद्यार्थी वर्गात बसून होते. या दोन परीक्षांसह गेल्या आठवडय़ात झालेल्या सेक्रेटेरिअल प्रॅक्टिस, हिंदी, इंग्रजी, मराठी अशा विषयांच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी आधीच प्रश्न फोडल्याचे पुरावे या पालकाने दिले आहेत.‘हे कनिष्ठ महाविद्यालय अनुदानित असून तब्बल ८००० विद्यार्थिनी येथे शिकतात. येथील ४६ तुकडय़ा अनुदानित असल्याने बहुतांश शिक्षकांचे वेतन सरकारच्या तिजोरीतून जाते. परंतु, शिकविण्याचे काम करण्याऐवजी प्रश्न फोडून आमच्या मुलींच्या शिक्षणाचा खेळखंडोबा हे शिक्षक करीत आहेतच. शिवाय सरकारचा पैसाही वाया घालवीत आहेत,’ अशी तक्रारही या पालकाने केली. या संबंधात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दीपा शर्मा यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी स्वत: खुलासा करण्याऐवजी महाविद्यालयाच्या पर्यवेक्षकांशी बोला, म्हणून सांगितले. या पर्यवेक्षकांनी आम्ही मुलींना स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा यासाठी या पद्धतीने परीक्षा घेत असल्याचा थातुरमातुर खुलासा केला. अर्थात या परीक्षांमध्ये बुद्धीचा असा काय कस लागतो, त्यासाठी प्रश्न आणि उत्तरे आधीच का पुरविली जातात अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नव्हती.
शिक्षण विभागाच्या नाकावर टिच्चून गैरप्रकार
शिक्षण विभागाच्या नाकावर टिच्चून या महाविद्यालयात अनेक प्रकारचे घोळ सुरू आहेत. या संबंधात अनेकदा वृत्त देऊनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. बारावीच्या विद्यार्थ्यांकडून १७ क्रमांकाचा अर्ज भरून घेण्याकरिता हे महाविद्यालय अडीच ते तीन हजार रुपये घेते. त्या बाबत राज्य शिक्षण मंडळाकडे तक्रार होऊनही महाविद्यालयावर कारवाई झालेली नाही. तसेच, स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमातून मिळणाऱ्या पैशावर डोळा ठेवून आपले अकरावी-बारावीचे वर्ग सायंकाळी पाच ते आठ यादरम्यान अकरावी-बारावीचे वर्ग चालवून आपल्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेशी हे महाविद्यालय कसे खेळते आहे, या बाबतही ‘मुंबई वृत्तांत’ने ७ मे, २०१५च्या अंकात ‘पैसे कमाविण्यासाठी महाविद्यालयाची मनमानी’ या वृत्तातून वाचा फोडली होती.
‘जनसेवा’ समितीमार्फत महिलांच्या सक्षमीकरणाकरिता म्हणून एम. डी. शाह महिला महाविद्यालय १९६८ साली सुरू करण्यात आले. हे महाविद्यालय एसएनडीटीशी संलग्नित आहे. या महाविद्यालयाचेच बाफना हे कनिष्ठ महाविद्यालय होय. महत्त्वाचे म्हणजे या समितीच्या व्यवस्थापन मंडळावर भारतीय जनता पक्षाचे मालाडमधील नगरसेवक राम बरोट यांचाही समावेश आहे.