काल आपण दोन्ही भाषा आणि गणित या बंधनकारक असलेल्या विषयांची उजळणी केली. आज आपण विज्ञान, भूगोल आणि इतिहास या विषयांची उजळणी करताना लक्षात घ्यायचे मुद्दे पाहू.

भूगोल :
भूगोलाची तयारी करताना अभ्यासक्रमातील संकल्पना, व्याख्या यांच्याबरोबरच चालू घडामोडींच्या अनुषंगानेही अभ्यास करणे गरजेचे आहे. प्राकृतिक व मानवी भूगोलासह महाराष्ट्र व भारताचा भूगोल याचा mu03अभ्यास करावा लागतो.  पर्यावरणासारख्या सद्य:स्थितीत चर्चेत असणाऱ्या समकालीन विषयालाही महत्त्व आहे. भूगोल व पर्यावरणसंबंधित संकल्पना, विशेषत: ज्या सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहेत, त्याचे ज्ञान व नोंदी असणे आवश्यक आहे. विविध संकल्पना, मुद्दे, त्यांचे स्वरूप व वैशिष्टय़े, त्यासंबंधी विविध स्वरूपाची वस्तुनिष्ठ माहिती, त्याविषयक संशोधन आणि तज्ज्ञांची मते आणि याविषयी अलीकडील काळात घडलेल्या चालू घडामोडी इ. विविध आयामांविषयी जाणून घेण्यावर भर द्यावा. त्यासाठी वृत्तपत्रे, नियतकालिके यांचे वाचन फायदेशीर ठरते.
भूगोलातील घटना त्यामागील भौगोलिक व वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घ्या. वस्तुनिष्ठ माहितीचा तुलनात्मक अभ्यासही फायदेशीर ठरेल. त्या संदर्भातील माहिती वर्गीकृत करून तिचे तुलनात्मक आकलन करावे. प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असले तरी विद्यार्थ्यांच्या आकलन, विश्लेषण क्षमतेची कसोटी लागणार यात शंका नाही. म्हणून अत्यंत जागरूकपणे भूगोलाचा अभ्यास करण्यावर भर द्यावा. आकडेवारी, आलेख, आकृत्या, कोष्टके, तक्ते, नकाशे यांचा वापर करून भूगोलाच्या तयारीत सुसंगता आणण्याचा प्रयत्न करावा. नकाशांमध्ये महत्त्वाच्या नोंदी करून ठेवल्यास लक्षात राहणे सोपे होते. आकडेवारी लक्षात ठेवण्यासाठी तक्ते आणि आलेख मदत करू शकतील.

इतिहास :
इतिहासाच्या अभ्यासात बहुतेकांना सन-सनावळ्यांचा बागुलबुवा वाटत असतो. मात्र तयारी करताना त्याची भीती बाळगू नका. इतिहासात सनावळ्यांना महत्त्व असले तरी तेवढेच लक्षात ठेवणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास नाही. वारंवार वाचन आणि उजळणी केल्यानंतर सन-सनावळ्या लक्षात राहतात. इतिहासातील प्रश्न माहितीप्रधान, विश्लेषणात्मक, कार्यकारण संबंधांवर, संकल्पनांवर व कालक्रमावर आधारित असतात. एखाद्या गोष्टीची रचना असते त्याप्रमाणे घटनाक्रम थोडक्यात लिहावा. त्यानंतर त्याची उजळणी करताना तपशील आठवावेत. जे तपशील आठवणार नाहीत, त्याच्या नोंदी पुन्हा एकदा पाहाव्यात. कालक्रम, प्रदेशानुसार इतिहास अशा घटकांचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्यापेक्षा घटना, तारखा, वर्षे, एका क्षेत्रात घटना घडत असताना त्याच काळात अन्य क्षेत्रांत, अन्य प्रदेशांत घडणाऱ्या घटना अशा पद्धतीने एकत्रित उजळणी करणे फायद्याचे ठरू शकेल.
संदर्भग्रंथांचा अभ्यास करणे महत्त्वाचे असले तरी इतिहासाचा अभ्यास करताना मोजक्याच पुस्तकांचा संदर्भ वापरावा. जास्तीतजास्त माहिती जमा करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त संदर्भाचा वापर न करता मोजकीच पण दर्जेदार संदर्भसाधने वापरली तर गोंधळ कमी होतो. एक किंवा दोन संदर्भग्रंथ हाताशी ठेवून त्याचा अभ्यास करावा.
आतापर्यंत आपण सहा विषयांची उजळणी आणि एकूण अभ्यासाची पद्धती कशी असावी याचा आढावा घेतला. यानंतरच्या भागांमध्ये अभ्यासक्रमातील महत्त्वाचे मुद्दे, व्याख्या, संकल्पना आणि सरावप्रश्न विषयानुसार पाहणार आहोत.

विज्ञान
विज्ञान हे उपयोजित असून या घटकाची तयारी अद्ययावत संदर्भासह करणे आवश्यक ठरते. विज्ञान विषयांतर्गत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे विषय येतात. त्यामध्ये ऊर्जा, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, भारताचे आण्विक धोरण आणि आपत्ती व्यवस्थापन या उपघटकांचा समावेश होतो. वैज्ञानिक संकल्पनांचे वस्तुनिष्ठ आकलन आणि संकल्पनांच्या उपयोजनासंदर्भातील अद्ययावत माहितीचे संकलन करावे. यातील संकल्पनात्मक आकलन आवश्यक आहे. विज्ञानातील संशोधन आणि विकासातील महत्त्वाच्या टप्प्यांचे तक्ते तयार करा. विज्ञानाची तयारी वस्तुनिष्ठ स्वरूपात करणे आवश्यक असून, त्यासाठी अचूक आणि अद्ययावत संदर्भ महत्त्वाचे ठरतात. विज्ञानातील प्रचलित घडामोडी, शासकीय कार्यक्रम, योजना व धोरणे याची माहिती असावी. विज्ञानातील घडामोडी, शोध, संशोधनाच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे, व्यक्ती व संस्था, नव्या उपचारपद्धती, औषधे, त्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, नवनवे आजार, त्यांची कारणे व उपाय अशी माहिती एकत्र करून ठेवावी. परीक्षेपूर्वी त्याची उजळणी करावी. विज्ञानातील विशेषत: भौतिकशास्त्रातील संकल्पना मुळातून समजून घ्या. बहुपर्यायी प्रश्न असल्यामुळे पाठांतरापेक्षा संकल्पना समजलेल्या असल्यास त्याचा उपयोग होईल.