विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाहीर झालेल्या मराठा आणि मुस्लीम आरक्षणाचे लाभ यंदा कुणालाच मिळणार नाही, अशी चर्चा असतानाच विद्यापीठाच्या लांबणाऱ्या निकालांमुळे थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) विषयाचे प्रवेशोच्छुक विद्यार्थी याचे पहिले लाभार्थी ठरले आहेत.
पदविकाधारक, बीएस्सी आदींना अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदवी अभ्यासक्रमाला थेट दुसऱ्या वर्षांला प्रवेश दिला जातो. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे करण्यात आलेल्या या प्रवेश प्रक्रियेत इतर अभ्यासक्रमांप्रमाणेच विद्यार्थी कमी आणि जागा जास्त अशी परिस्थिती असते. म्हणजे या वर्षी अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांकरिता १,०२,९२० इतक्या जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी ९८,२६१ जागा संचालनालय कॅपमार्फत (केंद्रीय प्रवेश प्रक्रिया) भरण्यात येणार आहेत, तर औषधनिर्माण शास्त्राच्या ४,६४० जागा कॅपमार्फत भरण्यात येणार आहेत. अभियांत्रिकीच्या १५,७२२ इतक्या जागा या मराठा आरक्षणातील आहेत. पण, पहिले वर्ष असूनही या आरक्षित जागांकरिता तब्बल ९,६१३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पण, मुस्लिमांकरिता आरक्षित असलेल्या ४,९१३ जागांपैकी केवळ ३८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. (पाहा चौकट)
जुलैमध्ये राज्य सरकारने मराठा व मुस्लिमांचा अनुक्रमे १६ व पाच टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रम व नोकऱ्यांमध्ये असलेले आरक्षणाचे एकूण प्रमाण ७३ टक्क्य़ांवर गेले आहे. मात्र, हे आरक्षण लागू होईपर्यंत बहुतांश अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे, यंदा कोणत्याच अभ्यासक्रमाकरिता हे आरक्षण लागू करता येणार नाही, अशी चर्चा होती. विविध विद्यापीठांचे निकाल उशिराने लागत असल्याने द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांकरिता ऑगस्ट उजाडतो. नेमके हेच कारण पथ्यावर पडल्याने यंदा या प्रवेशांकरिता हे आरक्षण लागू करणे शक्य झाले आहे. परिणामी यंदा मराठा व मुस्लीम विद्यार्थ्यांचा द्वितीय वर्ष प्रवेशाचा मार्ग सुकर होण्यास मदत झाली आहे.

मराठा-मुस्लीम आरक्षण यंदा सर्व अभ्यासक्रमांना लागू करता आले नाही. कारण, ते जाहीरच मुळात उशिरा झाले होते. परंतु, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमांचे निकाल लांबल्याने थेट दुसऱ्या वर्षांच्या प्रवेशाची प्रक्रियाच उशिराने सुरू झाली. परिणामी थेट दुसऱ्या वर्षांच्या अभ्यासक्रमांकरिता हे आरक्षण लागू करता येणे शक्य झाले. पण, पुढील वर्षांपासून हे आरक्षण सर्व अभ्यासक्रमांना लागू केले जाईल.
– सु. का. महाजन, संचालक, तंत्रशिक्षण