शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठीच्या शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहेत.
राज्यातील सर्व शाळांमध्ये उन्हाळी व दिवाळी सुटय़ांमध्ये सुसूत्रता यावी यासाठी संचालनालयातर्फे सुटय़ांचे नियोजन करण्यात येते. हे नियोजन करताना जून २०१४ ते मे २०१५ या कालावधीचा विचार केला जातो. यामुळे शाळांची सुटी २ मे पासून सुरू होणार आहे. दरवर्षी गणेशोत्सव आणि नाताळच्या सुटय़ांवरून वादावादी होते. यामुळे शाळांनी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांची परवानगी घेऊन या सुटय़ा ठरवाव्यात, असेही आदेशात म्हटले आहे. वर्षांला कामाचे दिवस २३० असून सुटय़ा ७६ पेक्षा जास्त होणार नाहीत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दिवाळीची सुटी १८ दिवस
शाळांचे पहिले सत्र १६ जून ते १९ ऑक्टोबर या कालावधीत असणार आहे. यानंतर दिवाळीची सुटी २० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत असेल. यानंतर ७ नोव्हेंबर ते १ मे या कालावधीत दुसरे सत्र होणार आहे.