माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी एनआयआयटी येत्या तीन वर्षांत एक लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहे. तसा करार त्यांनी नॅसकॉमसह केला आहे.एनआयआयटीने दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रशिक्षण कार्यक्रम दोन टप्प्यांत राबविला जाणार आहे. अभियांत्रिकी पदवीधरांसाठी ‘फाउंडेशन स्किल्स इन आयटी’ आणि कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी ‘ग्लोबल बिझनेस फाउंडेशन स्किल्स’ असा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.नॅसकॉमच्या सेक्टर स्किल कौन्सिलने एनआयआयटीसह उपरोक्त प्रशिक्षण कार्यक्रम देशभरात राबविण्याचा तीन वर्षांचा करार केला आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात एनआयआयटीसह नॅसकॉमचाही समावेश आहे. या करारामध्ये तीन वर्षांत एक लाख जणांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम १२० तासांचा असल्याचे सांगण्यात आले आहे.