आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धानाही आता क्रीडा विभागाच्या राज्यस्तरीय स्पर्धाचा दर्जा देण्यात आल्याने राज्यातील आश्रमशाळांमधील चार लाख विद्यार्थ्यांनाही आता २५ गुणांच्या सवलतीसह नोकरीत आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्याच्या क्रीडा संचालनालयाने आयोजिलेल्या क्रीडा स्पर्धामध्ये गुणवंत खेळाडूंना शालान्त परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी २५ गुणांचा लाभ दिला जातो, परंतु आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना या स्पर्धामधून वगळण्यात येत होते. परंतु आता या आदेशामुळे आदिवासी विभागातर्फे आयोजिल्या जाणाऱ्या स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे. हा निर्णय २०१५-१६ पासून लागू होणार असून १४, १७ व १९ वर्षांखालील वयोगटासाठी असलेल्या वयोमर्यादेसोबतच इयत्तेची अट पूर्ण करणारे विद्यार्थी पात्र ठरणार आहेत.