भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. सरकारने ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कमाल पात्रता वयोमर्यादेत दोन वर्षांची वाढ केली आहे. विशेष म्हणजे ही वाढ कायमस्वरूपी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी ठरवून देण्यात आलेल्या संधींची संख्याही दोनाने वाढविण्यात आली आहे.
१० फेब्रुवारी २०१४ रोजी केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने एक पत्रक प्रसिद्ध केले होते. ज्यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवांच्या परीक्षा देण्यासाठीच्या कमाल पात्रता वयोमर्यादेत वाढ केल्याचे तसेच ही परीक्षा देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या संधींची संख्या दोनने वाढविल्याचे म्हटले होते. मात्र, ही वाढ केवळ या दोन वर्षांसाठी देण्यात आली आहे की कायमस्वरूपी याबाबत प्रश्नचिन्ह होते.
मात्र, केंद्र सरकारने यास पूर्णविराम देत ही वाढ कायमस्वरूपी असल्याचे स्पष्ट केले. आता यामुळे खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ही परीक्षा ३२ व्या वर्षांपर्यंत तसेच जास्तीत जास्त सहा वेळा देता येणार आहे. अनुसूचित जाती आमि अनुसूचित जमातीतील उमेदवारांनी ही परीक्षा किती वेळा द्यावी यावर मर्यादा नाही, मात्र त्यांना आता ३५ ऐवजी ३७ व्या वर्षांपर्यंत देता येणार आहे. तर अन्य मागास विद्यार्थी वयाच्या ३५ व्या वर्षांपर्यंत आणि कमाल ९ वेळा ही परीक्षा देण्यास पात्र असतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.